खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

0
248

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका

गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. खाणप्रश्‍नासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आजपासून सुरू होत असलेल्या आठवड्यात दोन बैठका होणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्याबाबत संविधानिक व न्यायालयीन उपायांचा अवलंब करण्याबाबत केंद्र सरकार योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे मुख्मयंत्री डॉ. सावंत म्हणाले.
नवी दिल्लीतील दौर्‍यात आपण खाण प्रश्‍नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. अमित शहा हे खास करून गोव्यातील खाण उद्योग सुरू व्हावा यासाठी गोवा सरकारला मदत करण्यासाठी शक्य ते सगळे काही करीत असल्याचे सावंत म्हणाले. त्यासाठी आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आठवड्यात नवी दिल्लीत या प्रश्‍नावर चर्चेसाठी आणखी दोन बैठका घेणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरही सुनावणी चालूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आणखी लॉकडाऊन नाही
दरम्यान, राज्यात येणार्‍या वाढत्या पर्यटकांच्या ओघामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन परत एकदा गोव्यात लॉकडाऊन पुकारण्यात येणार असल्याची लोकांमध्ये चर्चा असली तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात नव्याने लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता काल फेटाळून लावली.
काल नवी दिल्लीहून परतल्यानंतर लॉकडाऊनसंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही. पुन्हा लॉकडाऊन करण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगून ते म्हणाले की आवश्यक ती काळजी घेऊनच आता लोकांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करावा लागेल. त्यासाठी समाजीक अंतराचे तत्त्व पाळणे, मास्क परिधान करणे याबरोबरच गर्दी न करणे आदी गोष्टींकडे लक्ष दिले तर कोरोनाला दूर ठेवणे कठीण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.