खाणपट्‌ट्यांच्या खरेदीसाठी २४ कंपन्या इच्छुक

0
5

>> राज्य सरकारच्या लिलावपूर्व बैठकीत घेतला सहभाग; डिसेंबरमध्ये लिलावाची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू; खाण संचालकांची माहिती

राज्य सरकारच्या खाण खात्याने काल आयोजित केलेल्या चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावपूर्व बैठकीत २४ खाण कंपन्यांनी सहभाग घेतला. या लिलावपूर्व बैठकीत देशातील काही मोठ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील सहभाग घेतला. त्यात मित्तल, जेएसडब्ल्यू, जिंदाल स्टील आदी कंपन्यांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसर्‍या बाजूला, या चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची प्रत्यक्ष प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी दिली.

खाण खात्याने गेल्या ३० सप्टेंबरला चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची नोटीस जारी केली होती, त्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव आणि काले येथील खाणपट्‌ट्यांचा समावेश आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात चार खाणपट्‌ट्यांतील सुमारे १४० दशलक्ष टन खनिजाचा लिलाव होणार आहे.

खाणपट्‌ट्यांच्या लिलावाच्या प्रक्रियेमुळे सुमारे साडे चार वर्षानंतर राज्यातील खनिज व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये एका आदेशाद्वारे राज्यातील खाण लिजेसचे नूतनीकरण रद्दबातल केल्यानंतर मार्च २०१८ पासून खनिज व्यवसाय ठप्प झाला आहे.
गोव्यासह आणि देशातील इतर राज्यांतील २४ खाण कंपन्यांनी खनिज लिलावाचे अर्ज विकत घेतले आहेत. या खाणपट्‌ट्यांच्या लिलावपूर्व बैठकीत गोव्यासह शेजारी राज्यातील खाण कंपन्यांनी सहभाग घेतला. ही बैठक पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रांगाझाच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत खाणपट्‌ट्यांच्या लिलावाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या बैठकीत खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खाणपट्‌ट्यांच्या लिलावासंबंधी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. तसेच, लिलाव प्रक्रिया व इतर बाबतीत लेखी स्वरूपात सुध्दा प्रश्‍न विचारले.

खाण कंपन्यांच्या प्रश्‍नांना ३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर
खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींनी लिलावाबाबत भरपूर प्रश्‍न उपस्थित केले. त्या प्रश्‍नांबाबत येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण दिले जाणार आहे. राज्यातील चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची प्रत्यक्ष प्रक्रिया येत्या डिसेंबरमध्ये सुरू केली जाईल, असेही खाण खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी सांगितले.

लिलावाबाबत कंपन्यांसमोर सादरीकरण
खाणपट्‌ट्यांच्या लिलावाला खाण कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खाणपट्‌ट्यांच्या लिलावपूर्व बैठकीमध्ये २४ खाण कंपन्या सहभागी झाल्या. त्यांच्यासमोर खाणपट्‌ट्यांच्या लिलावाबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच, एसएसटीसीने खाणपट्टे लिलाव प्रक्रियेची सविस्तर माहिती सदर कंपन्यांना दिली, असे खाण खात्याच्या संचालकांनी सांगितले.