खनिज वाहतूक दराबाबत साडे बारा रुपयांवर तडजोड

0
172

>> मुख्यमंत्री पर्रीकरांबरोबर ट्रक मालकांच्या बैठकीत ठरला दर

राज्यातील ट्रक मालकांनी खनिज वाहतुकीसाठीचे दर दहा कि. मी.साठी १४ रुपये न केल्यास एक नोव्हेंबरला सकाळी फोंडा-मोलें राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्रक मालकांच्या घेतलेल्या बैठकीत खनिज वाहतुकीचे दर प्रती टन प्रती किलो मीटर १२.५० रु. ठरवले.

पहिल्या १० किलोमीटरसाठी हे दर १२.५० रु. एवढे ठरवण्यात आले असून त्यानंतरच्या १० ते २० कि. मी. अंतरासाठी हे दर १२ रु. प्रती कि. मी. तर २० कि. मी. आणि त्याच्यापेक्षा जास्त अंतरासाठी हे दर ११.५० रु. असे ठरवण्यात आले. काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर ट्रक मालकांची बैठक झाली असता चर्चेनंतर हे दर निश्‍चित करण्यात आले. गेल्या बुधवारीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व ट्रक मालक यांच्यात बैठक झाली होती. तर काल १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा ट्रक मालक व मुख्यमंत्री यांची बैठक झाली. बुधवारी झालेल्या बैठकीतच खरे म्हणजे मुख्यमंत्र्यानी वरील वाढीव वाहतूक दर ठरवले होते. मात्र, कालच्या बैठकीत या वाढीव दरांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, या दरवाढी संबंधी तडजोड झाली असल्याचे सूत्रानी सांगितले. एका कुटुंबातील जास्तीत जास्त तीन ट्रकांनाच खनिजवाहू करता येईल. तसेच तालुक्याबाहेरील ट्रकांना खनिज वाहतूक करता येणार नाही अशा अटीही बैठकीत घालण्यात आल्या. दरम्यान, ज्या ट्रकमालकांचे ट्रक सध्या चालत नाहीत व ज्यानी यापूर्वी सरकारच्या आर्थिक मदत योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना पुढील एका वर्षासाठी सदर योजनेचा लाभ घेता येईल.