६४ कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्गांलगत झाडे

0
165

गोव्यातील पाच राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावण्याठी काल केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय (विभागीय कार्यालय) व गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ यांच्यात समझोता करार झाला. या करारानुसार गोव्यातील २६१ कि. मी. अंतरात ६४,३७,२४,७११ रु. एवढा निधी खर्च करून झाडे लावण्यात येणार आहेत. लवकरच हे काम हाती घेण्याचे या समझोता करारानुसार ठरवण्यात आले आहे, असे गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे चेअरमन आमदार दीपक पाऊसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काल झालेल्या एका कार्यक्रमात या समझोता करारावर सह्या करण्यात आल्या. केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक पाऊसकर व सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

ज्या राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा ही झाडे लावण्यात येणार आहेत ते महामार्ग महामार्गाचे अंतर व त्यावर येणारा खर्च खालीलप्रमाणे आहे.
महामार्ग १७- पत्रादेवी ते पोळे (१३३ कि. मी. अंतर) खर्च- ३२,६६,३५,०१२, महामार्ग ४४- गालजीबाग ते पोळे (१५ कि.मी.) खर्च ३,३७,३०,४२३. महामार्ग १७ बी फर्मागुडी सर्कल ते वर्णापुरी गेट (२० कि. मी.) खर्च ५,६४,०५,१६८, महामार्ग ४ ए – पणजी ते मोलें (अंतर ४३) खर्च ११,४९,३९,०१७, महामार्ग ४४- धारगळ ते उसगाव मार्ग (अंतर ५०) खर्च- ११,२१,१४,०९१.
गोव्याच्या मातीत उगवतात तसलीच झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगून चिंच, जांभूळ, आंबे, गुलमोहर अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार असल्याचे यावेळी कुंकळ्येकर यांनी सांगितले.

गोवा पहिले राज्य
राज्यातील महामार्गांवर दुतर्फा झाडे लावणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार असल्याचेही कुंकळ्येकर यानी यावेळी सांगितले.