क्रीडा पुरस्कार समितीत सेहवाग, सरदारला स्थान

0
141

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व दिग्गज हॉकीपटू सरदार सिंग यांचा राष्ट्रीय क्रीडा पुररस्कार निवडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १२ सदस्यीय समितीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापित केलेल्या या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मुकुंदम शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही क्रीडा मंत्रालयाने क्रीडापटू व प्रशिक्षकांच्या निवडीसाठी एकच समिती नेमली आहे. पॅरालिंपिक रौप्यपदक विजेत्या दीपा मलिक हिचादेखील या समितीत समावेश आहे.

‘मागील वर्षीप्रमाणेच यावेळी देखील आम्ही एकच निवड समितीची संकल्पना पुढे नेत असून अनेक समित्यांमुळे गोंधळ व वाद होऊ शकतात,’ असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या समितीत माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता, बॉक्सिंगपटू व्यंकटेशन देवराजन, क्रीडा समालोचक मनीष बाटविया, पत्रकार आलोक सिन्हा व नीरू भाटिया यांचादेखील समावेश आहे. या समितीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे डायरेक्टर जनरल संदीप प्रधान, सचिव (क्रीडा विकास) एल.एस. सिंग व टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राजगोपाळन सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा हॉकीचे दिग्गज ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी २८ ऑगस्ट रोजी होता. यंदा किमान एक ते दोन महिने हा सोहळा होणे शक्य नाही. द्रोणाचार्य पुरस्कारांची निवड करताना दोन माजी द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांना समितीचे अध्यक्ष स्थान देऊ शकतात, असे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे.