कोवॅक्सिन लशीची २-१८ वयाच्या मुलांवर चाचणीसाठी शिफारस

0
55

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकने आपल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लशीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसर्‍या तसेच तिसर्‍या टप्प्यासाठी तपासणीची शिफारस केली आहे. ही चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाईल.

भारत बायोटेकने मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचे आकलन करण्यासाठी कोवॅक्सिन डोसच्या दुसर्‍या तसेच तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) कोविड -१९ विषय तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकने केलेल्या विनंती अर्जावर चर्चा केली.

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत प्रामुख्याने लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील. त्यामुळे लहान मुलांवरील कोरोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्राणवायू लागू शकतो हे लक्षात घेऊन ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे केंद्र सरकार व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन प्राणवायू खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.