कोविड तज्ज्ञ समितीची उद्या होणार बैठक

0
17

>> राज्यातील कोरोना स्थितीचा घेणार आढावा

राज्यातील कोविड महामारीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोविड तज्ज्ञांची समितीची एक बैठक गुरुवार दि. ९ जून रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती ह्या समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

राज्यातील कोविड स्थिती या घडीला पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे काहीही कारण नाही. राज्यातील कोविड पॉझिटिव्हीटी दर हा १० टक्क्यांवर गेला, तर मात्र मास्क परिधान करणे हे सक्तीचे करावे लागणार आहे. सध्या राज्यात कोविड पॉझिटिव्हीटी दर हा ४ ते ७ टक्के या दरम्यान आहे. मुलांना कोविडचा संसर्ग झाला, तर त्यांना ह्या संसर्गामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता ही अगदीच कमी असल्याचेही डॉ. साळकर यांनी नमूद केले.

गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड तज्ज्ञ समितीची गुरुवारी बैठक होईल. त्यात जनतेने कोणती काळजी घ्यावी. तसेच आरोग्य खात्याने स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती पावले उचलावीत, याविषयी चर्चा होईल, असे डॉ. साळकर यांनी सांगितले.

नव्या ६२ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असून, राज्यात काल नवे ६२ कोरोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ९१५ जणांची कोविड चाचणी केली असता, त्यापैकी ६२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. पॉझिटिव्हीटी दर हा ६.७८ टक्के एवढा असून, गेल्या २४ तासांत ८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहे. या घडीला राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ही ३२८ एवढी आहे.