>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी
कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने हा सोहळा सरकार देशभर साजरा करू पहात आहे. यासाठी सरकारने केंद्राकडे १०० कोटीचा निधी मागितला आहे. सध्या कोविडमुळे अनेक लहान व्यक्तींच्या उद्योगांवर परिणाम झाला असून अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अशावेळी सरकारने हा निधी आणून तो असुरक्षित घटकांच्या संरक्षणात पॅकेज द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल म्हापशात केली.
काल रविवारी म्हापशातील कॉंग्रेस कार्यालयात गटाध्यक्ष तसेच जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उमेदवारांसोबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, उत्तर गोवा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भिके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
बैठकीनंतर कामत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्री. कामत यांनी, कोविडचे संक्रमण वाढत असताना सरकार जिल्हा पंचायत निवडणूक घेऊ पाहत आहे. दुसरीकडे हेच सरकार केवळ दक्षिण गोव्यातच १४४ कलम लागू करते आणि कोविड संक्रमणाचे कारण पुढे करते. मात्र, कोविडचा फैलाव हा काही दक्षिण गोव्यापुरताच मर्यादित नाही. त्यामुळे सरकारचा हा निर्णय व एकंदर वागणे हे विसगंतीचे असल्याची टीका केली. श्री. चोडणकर यांनी, जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांच्या सुरक्षेची खबरदारी घेत निवडणूक घ्यावी. तसेच सरकारने लपवाछपवी न करता तटस्थरित्या निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात, असे आवाहन केले.