>> प्रफुल्ल पटेल यांची पणजीतील जाहीर सभेत ग्वाही
गोव्यातील जनतेने सुरू केलेल्या कोळसाविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून पक्ष याप्रकरणी खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल तसेच पक्षाचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी काल आझाद मैदानावर झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केले. पक्षाचे माजी आमदार व माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनीही कोळसा वाहतूक तसेच रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास विरोध असल्याचे स्पष्ट केले.
चर्चिल आलेमांव यांनी भाजप सरकार राज्यात कोळसा आणू पाहत असल्याचा आरोप करून राज्यात कोळसा आणल्यास मोठ्या प्रमाणात गोव्यात कोळसा प्रदूषण होणार असून तसे झाल्यास राज्याच्या पर्यटनावरही गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
पक्षाचे निरीक्षक नरेंद्र वर्मा यांचेही यावेळी भाषण झाले. नेली रॉड्रिग्ज यांनी स्वागत तर अविनाश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सभेला सुमारे हजारभर लोक उपस्थित होते.
रेल्वे दुपदरीकरणाचा निर्णय
कामत सरकारच्या राजवटीत
गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाचा निर्णय दिगंबर कामत यांचे सरकार असताना रेल्वेने घेतला होता व कामत सरकारने या निर्णयाचे स्वागत केले होते, असे आलेमांव म्हणाले. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार शांताराम नाईक या तिन्ही खासदारांनीही रेल्वे दुपदरीकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले होते, अशी माहितीही आलेमांव यांनी यावेळी दिली. दिगंबर कामत हे आता कोणत्या तोंडाने रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करीत आहेत, असा प्रश्नही आलेमांव यांनी केला.