कोळशाच्या तुटवड्यामुळे देशभरात विजेची टंचाई

0
19

>> अनेक राज्यांत भारनियमन सुरू

मागील काही दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणात कोळशाचा तुटवडा जाणवत असून अनेक राज्यांवर वीज टंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे भारनियमनाचा मार्ग या राज्यांनी स्वीकारला आहे. ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारनियमनामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उद्योग व्यवसायांवरदेखील याचा परिणाम जाणवत आहे.

विजेच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कोळशाची वाहतूक करणार्‍या रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. मात्र त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत दररोज सुमारे १६ प्रवासी रेल्वे रद्द कराव्या लागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने २४ मेपर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास ६७० फेर्‍या रद्द करण्याची अधिसूचना दिली आहे. यामध्ये ५०० हून अधिक फेर्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोळसा उत्खननावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पावसाचे पाणी कोळसा खाणीत शिरल्याने उत्खनन करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोळसा वाहतुकीच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत.

कोळशाची टंचाई असल्याकारणामुळे वीज निर्मितीवर याचा परिणाम झाला आहे. अनेक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांत विजेची कमतरता आहे. सध्या देशातील औष्णिक ऊर्जा केंद्रांत २१ मिलियन टन कोळसा साठा शिल्लक आहे. हा साठा १० दिवस पुरेल एवढा आहे.