कोरोना विरोधात मुख्य औषधी द्रव्ये

0
213

 –  डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

संगीत साधना, योगसाधना, यम-नियमांचे पालन, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, नामस्मरण- जप- ध्यानाद्वारे मानसिक आरोग्य तर प्राप्त करायचेच आहे, त्याचबरोबर शारीरिक बल व व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी काही आयुर्वेदीय औषधी द्रव्यांचा नित्य उपयोग प्रत्येकाने करावा, असे आयुष विभागाने जनसमुदायाला आवाहन केले आहे.

गावात आपण सुरक्षित आहोत. आपल्याला कोरोना व्हायरसची भीति नाही. आपल्याला काय मोठी काळजी घ्यायची गरज नाही. आपल्यावर सरकार जबरदस्तीने नियम लादत आहे .. असे म्हणणे अतिशयोक्तीच नव्हे का? मान्य आहे गोवा, सिंधुदुर्ग म्हणजे गोव्यानजीकचा कोकण पट्टा हा सुरक्षित आहे. कारण इथले वातावरण शुद्ध आहे. शुद्ध हवा, पाणी, पोषक आहार अजूनही मुबलक प्रमाणात मिळतो आहे. तरीही अशा जिवघेण्या कोरोना व्हायरसशी दोन हात करायला आपण नेहमी सज्ज असायला हवे. म्हणून प्रत्येक नागरिकाने योग्य ती खबरदारी नक्की घ्यावी- जसे हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे किंवा साबणाने धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे. या मुलभूत खबरदारीच्या उपायांबरोबरच सर्वात महत्त्वाचे आहे प्रत्येकाने स्वतःची व्याधीप्रतिकार शक्ती एवढी वाढवावी की कोरोना व्हायरसच काय तर कुठलाच व्हायरस आपल्या शरिराचे काहीच वाकडे करू शकत नाही.
संगीत साधना, योगसाधना, यम-नियमांचे पालन, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, नामस्मरण- जप- ध्यानाद्वारे मानसिक आरोग्य तर प्राप्त करायचेच आहे, त्याचबरोबर शारीरिक बल वाढवण्यासाठी, व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी काही आयुर्वेदीय औषधी द्रव्यांचा नित्य उपयोग प्रत्येकाने करावा असे आयुष विभागाने जनसमुदायाला आवाहन केले आहे. या औषधी द्रव्यांबद्दल जाणून घेऊ…

* गुळवेल – गुळवेल किंवा गुडूची ही कधी न सुकणारी वेल आहे. या औषधीचे गुणधर्म अमृताप्रमाणे असल्याने हिला अमृतही म्हटले जाते. हे एक श्रेष्ठ रसायन द्रव्य आहे.
– गुळवेल त्रिदोषशामक आहे.
स्निग्ध असल्याने वातशामक आणि तिक्त, कषाय असल्याने कफ- पित्त नाशक आहे.
– गुणधर्मानुसार गुडूची कुष्ठघ्न, वेदनास्थापक, तृष्णा निग्रहण करणारी छर्दिनिग्रहण करणारी, दीपन- पाचन- पित्तसारण करणारी, अनुलोमक व कृमीघ्न आहे.
– आमाशयातील आम्लता कमी करणारी, हृदयाला बल देणारी, रक्कविकार व पाण्डू रोगातही गुणकारी आहे.
– खोकला, दौर्बल्य, प्रमेह, सगळ्या प्रकारच्या तापांमध्ये विशेष गुणकारी आहे.
– गुडूची सूक्ष्मतम विषाणूसमूहापासून स्थूल कृमींवर विशेष कार्य करणारी आहे. शरिरातील ज्या भागात जिवाणू शांत अवस्थेमध्ये पडलेले असतात, गुडूची तिथे जाऊन विषाणूंचा नाश करते.
म्हणून विषाणूंवर होणार्‍या गुडूचीच्या कार्याचा विचार करता या कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकाने गुडूचीचे सेवन करावे. गुडूची घनवटी म्हणा किंवा गिलोय रस म्हणा किंवा गोव्यामध्ये बर्‍याच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गुडूची चूर्ण उपलब्ध आहे. ते विनामूल्य आहे. ते घेऊन जाऊन त्याचा काढा करून प्यावा. काढा करण्यासाठी पाव चमचा गुडूची पावडर, दीड लीटर पाण्यामध्ये घालून चांगले उकळून घ्यावे व हे पाणी दिवसभर प्यावे. हे पाणी संपल्यावर कोमट पाणी प्यावे. याने व्याधीक्षमत्व तर वाढणार आहेच, त्याचबरोबर विणाणूंचा नाश व्हायलाही मदत होईल.

* तुळस – तुळस ही सर्व रोग निवारण करणारी, जीवनीय शक्तिवर्धन करणारी असल्याने प्रत्यक्ष देवीच म्हटलेले आहे. सर्वत्र सुलभतेने उपलब्ध असलेली ही एकदम स्वस्त अशी ही औषधी आहे. तुळशीला धार्मिक महत्त्व असल्याने तुळशी सर्व घरांच्या अंगणात प्रायः बघायला मिळते.
गुणधर्मानुसार तुळस ही कफवात शामक, जन्तुघ्न, दुर्गंधीनाशक, दीपक- पाचक- अनुलोमक, रक्कशोधक, स्वेदजनक व ज्वरघ्न आहे.
– सर्दी व विषम ज्वरामध्ये तुळशीच्या पानांचा स्वरस अत्यंत उपयोगी आहे.
– तुळशीचे रोप हे मलेरिया प्रतिरोधक आहे. म्हणूनच मलेरियाचे डास तुळशीच्या रोपापासून दूर पळतात.
– काळ्या तुळशीचा स्वरस, गायीच्या तूपासोबत चाटण्याने न्युमोनियामध्येसुद्धा आराम मिळतो.
– तुळस ही श्‍वसनसंस्थेवर अत्यंत उपयुक्त आहे व अगदी सहज उपलब्ध असणारे औषधी द्रव्य आहे.

* दालचिनी – दालचिनी हे आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यामधील अगदी सहज उपलब्ध असणारे औषधी द्रव्य आहे.
– गुणधर्मानुसार तीक्ष्ण, किंचित कडू, मधुर, उष्ण, दीपक-पाचक, वातानुलोमक, आमाशयाला हितकर असे औषधी द्रव्य आहे.
– सर्दी-तापामध्ये दालचिनीचा तुकडा पाण्यात टाकून चांगले उकळून चहासारखे प्यायल्याने शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, डोके दुखण्यापासून लगेच आराम मिळतो.
– खोकल्यामध्ये दालचिनीची पावडर मधाबरोबर चाटण्याने आराम मिळतो.

* सुंठी – आल्याची साधारण भारतामध्ये सर्वत्र लागवड केली जाते. आर्द्र अवस्थेत या औषधी द्रव्याला आले म्हणतात व सुकलेल्या अवस्थेत सुंठ. गुणधर्मानुसार सुंठ कफ-वात शामक आहे.
– सर्दीचा नाश करणारी, शोथहर व वेदना दूर करणारी आहे. रोचन, दीपन, पाचन, वातानुलोमन, शूल प्रशमन करणारी आहे.
– सुंठ कटू व स्निग्ध असल्याने स्रोतोरोध दूर करते. मधुर विपाकी असल्याने वृष्य आहे व उष्ण असल्याने उत्तेजक आहे.
– सुंठ एक उत्तम आमपाचक आहे. त्यामुळे विविध रोगांपासून बचाव होतो म्हणून ज्वरामध्ये उपयुक्त आहे.
– सुंठ पावडर व मधाचे मिश्रण चाटण्याने सर्दी, खोकला, श्‍वासात उपयोग होतो.
– आल्याच्या रसात जुने तूप व कापूर मिसळून गरम करून छातीवर लावल्यास न्युमोनियामध्ये आराम मिळतो.

* मरिच (काळी मिरी) – प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आढळणारे हेही एक औषधी द्रव्य आहे.
गुणधर्मानुसार मिरी वातशामक, कफघ्न आणि कफ निःसारक आहे. तीक्ष्ण व उष्ण असल्याने लालास्रावजनक आहे. दीपन, पाचन, यकृत उत्तेजक, वातानुलोमन, श्‍वास, शूलनाशक व कृमिघ्न आहे.
– २ ग्रॅम मिरी चूर्ण गरम दुधाबरोबर किंवा खडीसाखरेबरोबर सेवन केल्यास सर्दीमध्ये लगेच आराम मिळतो.
– मिरी चूर्ण मध वन तूपाबरोबर सकाळी-सायंकाळी चाटण्याने खोकला, दमा, छातीत दुखणे यामध्ये उपयुक्त ठरते. त्याचबरोबर फुफ्फुसातून कफ बाहेर पडण्यास मदत होते.
– साधारण तापात एक ग्रॅम मिरी चूर्ण अर्धा लीटर पाणी व २० ग्रॅम मिश्रीबरोबर एक अष्टमांश क्वाथ सिद्ध करून पिण्याने लगेच आराम वाटतो.
अशा या बहुगुणी औषधी द्रव्यांचा कोरोना व्हायरसच्या लढ्यात महत्त्वाचा वाटा आहे. तुळशीच्या पाने – ४ भाग, दालचिनी – २ भाग, सुंठ- २ भाग व मिरी – १ भाग = सर्व एकत्र करून सकाळ- संध्याकाळ चहा बनवून पिणे हे सगळ्यांसाठीच हितकर आहे.