शुक्रवारी १०० रुग्ण, तिघांचा मृत्यू
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून २४ तासांत नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, आणखी ३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
सध्याच्या कोरोना रूग्णांची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,८७१ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८७ एवढी झाली आहे.
देशातील अनेक राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. राज्यात मागील कित्येक दिवसांपासून नवीन कोरोना रूग्णांची संख्या कमी होती. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात गुरूवार २५ रोजी नवीन ७१ रूग्ण आढळून आले होते. तर, शुक्रवारी नवीन १०० रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७९४ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये म्हापसा येथील ८९ वर्षीय पुरूष रुग्ण, आगशी येथील ७२ वर्षीय महिला रूग्ण आणि मुरगाव येथील ८१ वर्षीय पुरूष रूग्णाचे निधन झाले आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४१ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १८१३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ५.५१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४६ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना रूग्णाची संख्या ६९ झाली आहे. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. पर्वरी आरोग्य केंद्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २९ झाली आहे. फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात २९ रुग्ण, चिंबल ४७ रुग्ण, म्हापसा ३९ रुग्ण, कांदोळी ४९ रुग्ण, वास्कोत २१ रुग्ण आहेत.
अफवा नकोत ः मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचे वाढते रूग्ण हा चिंतेचा विषय आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नियमांचे पालन करावे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.