कोरोना ओसरला; शाळा फुलल्या…

0
24
  • – प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

जवळ-जवळ दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत आहेत, तेव्हा शिक्षकांनी प्रथम मुलांचं मानस समजून घ्यायला हवं. महामारीचा परिणाम अनेक कुटुंबांवर झाला आहे. कोणाची आर्थिक स्थिती खूप कमजोर झाली, तर कोणाच्या घरातील माणसं दगावलीत. या सर्वाचा आघात कोवळ्या मनांवर अधिक झालेला आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे प्रथम न लागता औदासिन्य, आळस, चालढकल, सुस्तपणा यातून मुलं बाहेर कशी पडतील याचा विचार करायला हवा.

‘समस्या निर्माण झाली तेव्हा आपण जसा विचार करत होतो, तसाच विचार करून समस्या सुटणार नाही’- आल्बर्ट आईन्स्टाईन. याचा अर्थ स्पष्ट आहे. समस्या सोडविण्यासाठी आपल्याला नव्या दिशेने, पद्धतीने विचार करावा लागणार.

कोरोनानंतरच्या शिक्षणाचाही असाच विचार करावा लागणार आहे. कोरोनापूर्वीचं आणि कोरोनानंतरचं शिक्षण यात खूप अंतर आहे. पण याची जाणीव अनेकांना झालेली नाही. त्यामुळे ज्या पद्धती कोरोनापूर्वी वापरल्या जात होत्या त्या आज, नव्याने शाळा सुरू होताना, वापरून अपेक्षित परिणाम साधणार नाही.

शाळा परत सुरू झाल्या आहेत. शिक्षकांनी काही ठिकाणी कल्पकतेने मुलांचे स्वागत केल्याच्या बातम्या व चित्रे माध्यमांद्वारे समोर आली आहेत. हा एक सुखद अनुभव आहे. पहिलं पाऊल खूप चांगलं पडलंय. प्रत्येक शाळेला ही संधी होती. ‘सिक्रेेट ऑफ एज्युकेशन इज रिस्पेक्टिंग दी चाईल्ड’ असं म्हटलं जातं. शाळेत आपल्या व्यक्तिमत्त्वाची कदर केली जाते, योग्य सन्मान केला जातो असं मुलांना वाटणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी शाळेला हवा/हवी आहे असं मुलांना वाटणे ही शिकण्यासाठी आवश्यक बाब आहे. शिकण्यासाठी मनोभूमिका तयार करणे ही पहिली पायरी आहे. बी पेरण्यासाठी जशी जमीन तयार करावी लागते, तसेच शिकण्यासाठी योग्य, अनुकूल, पोषक मनोभूमीची गरज असते. हे लक्षात न घेता जे कोणी अभ्यासक्रम पुरा करण्याचा प्रयत्न करत असत ते खडकावर बी पेरतात हे लक्षात घ्यायला हवं.

जवळ-जवळ दोन वर्षांनंतर आज जेव्हा शाळा सुरू होत आहेत तेव्हा शिक्षकांनी प्रथम मुलांचं मानस समजून घ्यायला हवं. महामारीचा परिणाम अनेक कुटुंबांवर झाला आहे. कोणाची आर्थिक स्थिती खूप कमजोर झाली, तर कोणाच्या घरातील माणसं दगावलीत. कोणाला अनेक दिवस इस्पितळात काढावे लागले, तर कोणाला घरातल्या घरात पण इतरांपासून विलग होऊन राहावे लागले. या सर्वांचा आघात कोवळ्या मनांवर अधिक झालेला आहे हेही लक्षात घ्यायला हवे.
अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे प्रथम न लागता औदासिन्य, आळस, चालढकल, सुस्तपणा यातून मुलं बाहेर कशी पडतील याचा विचार अगोदर व्हायला हवा. शाळेत समुपदेशक आहेत. पण प्रत्येक शिक्षकाला समुपदेशकाची भूमिका वठवायला हवी. नैराश्य, चीडचीड यातून मुलं कशी बाहेर पडतील याचा विचार व्हायला हवा.

प्रत्यक्ष विषय, धडा शिकण्या आणि शिकविण्याअगोदर मनं उल्हसित करणे, चैतन्य निर्माण करणे, जिज्ञासा आणि इच्छा जागृत करणे याला प्राधान्य द्यायला हवे.
एका विचारवंताचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तो म्हणतो ः ‘ए टिचर, हू इज अटेम्पटिंग टू टिच विदाऊट इन्स्पायरिंग दी प्युपील वुईथ ए डिझायर टू लर्न, इज हॅमरिंग ऑन कोल्ड आयर्न.’ लोखंडाला आकार देण्यासाठी जसं भट्टीत घालून तापवावं लागतं, तसंच प्रत्यक्ष शिकविण्यापूर्वी मुलांना प्रोत्साहित, प्रेरित करायचं असतं. दोन वर्षांचा दीर्घ काळ एका विचित्र परिस्थितीत गेलेला आहे याचं भान शिक्षकांनी ठेवायला हवं. हे एक मोठं आव्हान आहे. मुलांनी जे दोन वर्षांत बघितलं, भोगलं, अनुभवलं ते व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळायला हवी. दबलेलं मन प्रथम मोकळं व्हायला हवं. हे करताना विविधता, कल्पकता, नावीन्य हवं. ठोकळेबाज प्रश्‍न विचारून आणि साचेबद्ध पद्धतींचा उपयोग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

दोन वर्षांनंतर मुलं प्रत्यक्ष समोर भेटल्यावर काही शिक्षक अभ्यासक्रम ‘पूर्ण’ करण्याच्या मागे लागणार आहेत. ‘गॅप’ भरून काढण्यासाठी सुसाट वेगाने गाडी हाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन वर्षांची कसर कशी भरून काढायची हेच प्रामुख्याने बघणार आहेत. त्यांनी आपल्या वेगाला आवर घालायला हवा. विषय समाप्त करण्याच्या नादात मुलांची शिकण्याची रूचीच समाप्त होणार नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी.
खरं तर धडे आणि विषय शिकवण्यासाठी जितका वेळ, शक्ती, मेहनत घेतली जाते, त्यापैकी किमान २५ टक्के वेळ, शक्ती आणि मेहनत मुलांना ‘कसं शिकायचं’ हे शिकवायला खर्च केली तर त्याचा उपयोग आणि परिणाम अधिक आहे.

मार्क कॉलिन्स म्हणतात ः ‘वन्स चिल्डरन लर्न हाऊ टू लर्न. नथिंग इज गोईंग टू नॅरो देअर माईंड.’ ‘दी वर्ल्ड इज फ्लॅट’चे लेखक फ्राइडमन म्हणतात ः ‘बिईंग अडाप्टेबल इन अ फ्लॅट वर्ल्ड, नोईंग हाऊ टू ‘लर्न हाऊ टू लर्न’ विल बी वन ऑफ दी मोस्ट इम्पोर्टन्ट ऍसेस्टस् ऍनी वर्कर विल हॅव.’
दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणाचे खूप प्रयोग झाले. खरं तर ते एक उत्तम, प्रभावी साधन आहे. कोरोनामुळे त्याचा प्रयोग झाला. पण योग्य परिणाम मिळवता आला नाही. हा पद्धतीचा किंवा तंत्रज्ञानाचा दोष नसून तो हाताळणार्‍यांचा दोष होता आणि पुढेही राहील. या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा फायदा कसा करून घेता येईल या दिशेने प्रयत्न, प्रयोग करायला हवेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यामुळे ऑनलाईन पद्धत पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. उलट याचा प्रभावी उपयोग कसा करून घेता येईल या दिशेने विचार सुरू व्हायला हवा. तंत्रज्ञानाचे खाचखळगे, उपयुक्तता या बाबतीत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना अधिक सजग, सतर्क, सुजाण बनवायला हवं.

ऑनलाईन + ऑफलाईन असं मेतकूट जर छान जमलं तर सर्वांचाच फायदा होईल. कोणत्याही विषयावरचे उत्तम, प्रभावी व्हिडिओ उपलब्ध होऊ शकतात. शिक्षकांना स्वतः असे व्हिडिओ बघून स्वतःची कौशल्ये वाढवता येतील आणि विद्यार्थ्यांना पूरक ठरतील. शिक्षकांनी स्वतःचेही व्हिडिओ तयार करून अपलोड केले तर विद्यार्थ्यांनाही ते वारंवार बघून विषय पक्का करून घेता येईल. त्यासाठी पालकांनाही हे सारं समजावून सांगावं लागेल. व्यवस्थापनानेही या नव्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. ज्या शाळांपाशी पुरेशी जागा आहे त्यांनी स्वतःचा छोटासा स्टुडिओ उभारावा. कमीत कमी जागेत आणि साधनांनिशी असा व्हिडिओ स्टुडिओ उभारता येतो. व्यवस्थापनाच्या इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीचीच गरज आहे.

शाळेचा पालकांकडे अधिक जिवंत संपर्क हवा. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तर पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. पालक ही मोठी शक्ती आहे. या शक्तीचा विधायक उपयोग करून घेणारी शाळा पुढे जाणार आहे. पालकांना नव्या तंत्रज्ञानाचं महत्त्व, उपयोग आणि कौशल्य समजावून सांगायला हवं. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शाळांना पालकांशी आपला संपर्क आणि नातं अधिक दृढ करण्याची संधी मिळाली आहे. वर्गशः पालकांच्या ऑनलाईन सभांची संख्या वाढवता येईल. परिस्थितीचं गांभीर्य आणि उपलब्ध असलेल्या संधी याबाबतीत पालकांना जागरूक करायला हवं.

मुलांचा एक व्यापक डेटा गोळा करायला हवा. डेटा हे नवीन इंधन आहे असं म्हटलं जातं. हा डेटा अनेक दृष्टीनी उपयुक्त असतो. त्याचं नीट विश्‍लेषण झाल्यास अनेक समस्यांचा निचरा होऊ शकतो.

शाळा आणि परिसराची स्वच्छता याला महत्त्व दिलं पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण व्हायला हवी. केवळ मुलांना स्वच्छता आणि व्यायामावर शिक्षकांनी भाषणं न देता सर्वजण त्या दिशेने प्रयत्नशील राहतील याची खबरदारी घ्यायला हवी.

दोन वर्षांत खूप नुकसान झाले आहे हे जितके खरे आहे तितकेच अनेक नवनवीन संधीची दालनं खुली झाली आहेत हेही लक्षात घ्यायला हवं. पुढील काळात आणखीही दालनं खुली होतील. त्याचा फायदा घेण्याची तयारी हवी.
या आपत्तीतून खरं तर सरकारी अधिकारी आणि शासनकर्ते यांनीही खूप शिकण्यासारखं आहे. नवी क्षेत्रं, नव्या गरजा, नवी साधनं, मूलभूत संसाधनं यांचा नव्यानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. साचेबद्ध विचार आणि जीवन यातून बाहेर पडायला हवं.

पुढच्या काळात शिक्षणसंस्थांना स्वायत्तता देण्याचाही विचार आहे. पण त्यासाठी पात्रता, योग्यता आणि तयारी हवी. अनेकांना स्वायत्तता पचवता आली नाही. त्यात जोखीमही आहे. भविष्यात शिक्षणात अनेक बदल होणार आहेत. त्या बदलांचं स्वागत करूया आणि शिक्षणाला नवी दिशा देऊया.
‘शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजेच शिक्षण’ हा विचार जपूया.