कोरोनासाठी सर्वपक्षीय सल्लागार समिती स्थापन करावी ः सरदेसाई

0
104

कोरोनामुळे जी आपत्ती निर्माण झाली आहे त्या आपत्तीवर यशस्वीपणे मात करता यावी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना करावी अशी मागणी काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केली.

सरकारने जर सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना केली तर या कठीण प्रसंगी योग्य ते निर्णय योग्यवेळी घेणे सरकारला शक्य होणार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षामध्ये कित्येक माजी मुख्यमंत्री आहेत, या मुख्यमंत्र्यांचा अनुभव हा दांडगा आहे. प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, रवी नाईक असे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षात असून या नेत्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. सरकारने सर्वपक्षीय सल्लागार समिती स्थापन केल्यास या माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य पक्षांतील विविध नेत्यांच्या अनुभवाचाही सरकारला निर्णय घेताना फायदा होणार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे .

सरकारने जर सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना केली तर पक्षपातीपणा होणार नसल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी ३० आमदारांची बैठक घेणे हा या आपत्तीच्या काळातील पक्षपाताचाच एक प्रकार होता असे सरदेसाई म्हटले आहे.

लोकांना़ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा चालू रहायला हवा असे केंद्राने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे म्हटले होते. मात्र असे असताना राज्य सरकारला ते करणे शक्य झाले नव्हते. निर्णय घेण्याची क्षमताच सरकारमध्ये नसल्याचे यावेळी दिसून आल्याचे सरदेसाई म्हणाले.

कोरोनाचे संकट आलेले असताना सरकारला त्याची तीव्रता दिसून आली नव्हती असे सांगत हा इतिहास पहाता आता सरकारने विरोधी पक्षांना आपल्याबरोबर घेऊन या आपत्तीविरोधात लढा देण्यासाठी सर्पपक्षीय सल्लागार समितीची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.