>> चोवीस तासांत ८३ बाधित, पॉझिटिव्हिटी १.५८ टक्के
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे पुन्हा चार रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ८३ रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८३० झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३१२ एवढी आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ५२४९ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के झाले आहे. तर कोरोना पॉझिटिव्हिटी दर १.५८ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ५ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १५ एवढी आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ६८ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाधिक रुग्णसंख्या मडगावात
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या १२४ एवढी आहे. त्या खालोखाल पणजीत व कांदोळीत प्रत्येकी ५१, फोंडा ४६, कुठ्ठाळी ४०, शिवोली ३१, पर्वरी ३०, म्हापसा व बाळ्ळी प्रत्येकी २९, कासावली २४ अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७२,१७६ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७६,३१८ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १३,४८,३५४ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२३,३०१ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,४९८ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
देशपातळीवर कोरोना रुग्णसंख्येत घट
चोवीस तासांत १८,८७० बाधित
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. काल बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात १८ हजार ८७० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ कोटी ३७ लाख १६ हजार ४५१ झाली आहे. तसेच याच एक दिवसात कोरोनामुळे ३७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४ लाख ४७ हजार ७५१ वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहता देशातील करोना संसर्ग आता बर्याच अंशी नियंत्रणात आला आहे. मंगळवार दि. २८ सप्टेंबर रोजी नोंद झालेली आकडेवारी ही सोमवार दि. २७ सप्टेंबरच्या तुलनेत २७.८ टक्के कमी होती. महत्त्वाची बाब म्हणजे देशात गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना प्रकरणांची संख्या २० हजारांच्या खाली गेली आहे.
मंगळवारी ५ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. केरळमध्ये ११ हजार १९६, तमिळनाडूमध्ये १ हजार ६३०, मिझोराममध्ये १ हजार ३८०, आंध्र प्रदेश ७७१ तर पश्चिम बंगालमध्ये ७०८ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. या पाच राज्यांत कमीतकमी ८३.१२ टक्के नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर त्यापैकी तब्बल ५९.३३ टक्के रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये आहे.
५४ लाख लसीकरण
करोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचा विचार करता, देशात गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५४ लाख १३ हजार ३३२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ८७ कोटी ६६ लाख ६३ हजार ४९० नागरिकांना लस देण्यात आली आहे.