कॅप्टन अमरिंदर सिंगनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

0
41

>> सुमारे पाऊण तास झाली चर्चा

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर कॉंग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गृहमंत्री शहा आणि अमरिंदर सिंग यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली असून अमरिंदर सिंग आज गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीवेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते. दरम्यान, अमित शहांसोबतच्या ४५ मिनिटांच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांनी भाजपचा पाठिंबा मागितला असून शेतकर्‍यांचे प्रश्न आणि पंजाबमधील सुरक्षेवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषी कायद्यांसंबधी अमरिंदर सिंग हे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना भेटण्याची शक्यता असून केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चामधील मध्यस्थ म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.
अमरिंदर सिंग हे शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री असताना शेतकरी आंदोलन शांततेत सुरू होते. यानंतर शेतकर्‍यांनी दिल्लीवर धडक दिली. अमरिंदर सिंग यांनी त्यांना रोखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. शेतकर्‍यांसोबत अमरिंदर सिंग यांचे संबंध चांगले आहेत.