कोरोनामुक्त; तरीही चिंतायुक्त

0
104
  • शंभुभाऊ बांदेकर

आज आपण देशाचा ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तसे पाहिले तर आपला देश महामारीच्या महासंकटातून बाहेर पडू लागला आहे, असे सुचिन्ह दिसू लागले आहे. हे खरे असले तरी हा प्रजासत्ताक खूप मोठी आव्हानं घेऊन पुढे सरकत आहे, असे दृश्य आपल्याला दिसते आहे. कोणती ती आव्हानं ?? …

आज आपण देशाचा ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपला गेल्या वेळचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२० हा कोरोना विषाणूच्या विषवल्लीमुळे चिंतायुक्त होता. आपल्या राज्याचा हीरक महोत्सव १९ डिसेंबर २०२० हाही विषाणूच्या महामारीमुळे आपण तणावयुक्त वातावरणात घालवला. महामहीम राष्ट्रपती श्री. कोविंद जरी या महोत्सवात सामील झाले, तरी येथील कोविदची चिंता सगळ्यांनाच होती. तशातच राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर या महामारीला बळी पडलेले तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे सपत्निक या विषाणूमुळे रुग्णालयात दाखल झाले. शिवाय एखादा दिवस या विषाणूच्या संकटाने बरा गेला तर मग दुसर्‍या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झालेली, बळींची संख्या वाढलेली. हे चित्र गोव्यापुरतेच नव्हे तर देशभर चालू असलेले. यात अत्यंत समाधानाची गोष्ट म्हणजे १६ जानेवारीपासून गोव्यासकट संपूर्ण देशात आणि जगातही कोरोना लसीकरण सुरू झालेले. त्यामुळे केंद्रात व राज्य सरकारांनीही सुटकेचा श्वास सोडला आणि जाम झालेला आम आदमीही यापुढे चांगले दिवस येतील या आशेने व इराद्याने चिंतामुक्त झाला ही खरोखरच या नूतन वर्षातील पहिली आनंददायी घटना म्हणावी लागेल.

तसे पाहिले तर आपला देश महामारीच्या महासंकटातून बाहेर पडू लागला आहे, असे सुचिन्ह दिसू लागले आहे. हे खरे असले तरी हा प्रजासत्ताक खूप मोठी आव्हानं घेऊन पुढे सरकत आहे, असे दृश्य आपल्याला दिसते आहे. या आव्हानांमध्ये वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती इंधनवाढ, वाढणारे जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणि महिलांवरील वाढत्या जुलुम, जबरदस्ती आणि अत्याचार, बलात्कारांचे घावजसे आहेत त्याचप्रमाणे अंतर्गत दहशतवाद आणि आपले शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्या अरेरावीमुळे बळावलेला सीमावाद यांचाही समावेश आहे.

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी स्वतंत्र झाला, तरी २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालेल्या संविधानामुळे त्या दिवसापासून आपला देश खर्‍या अर्थाने आदर्श लोकशाहीच्या चौकटीत जाऊन बसला आहे व हा देश लोकांसाठी, लोकांकरिता, लोकांनी चालविलेला ही बिरुदावली अस्तित्वात आली. भारतीय संविधानाचे हे महत्त्व लक्षात घेताना हे संविधान अथक परिश्रमांती ज्यांनी बनविले ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर, संविधानाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व इतर सदस्यांचे ऋण मान्य करणे हे आम्हा भारतीयांचे कर्तव्य ठरते. कोण आहेत या महान व्यक्ती??
डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानाच्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. या समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. राधाकृष्णन्, अल्लादि कृष्णस्वामी अय्यर, बी. एन. राव, कन्हैय्यालाल मुन्शी, टी.टी. कृष्णम्माचारी, सच्चिदानंद सिन्हा, श्रीकृष्ण सिन्हा, बॅरिस्टर जयकर, सरदार बलदेवसिंग, बाबू जगजीवनराम, जॉन मथाई, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, आचार्य कृपलानी, एच. व्ही. कामत, पट्टाभिसीतारामय्या, पुरुषोत्तमदास टंडन, मिनू मसानी, फ्रँक अँथनी, हृदयनाथ कुझेरू आणि एस. एन. मुखर्जी यांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून डॉ. राजेंद्र प्रसादापर्यंत आणि समितीतील सर्व मान्यवर सभासदांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे आपला देश हा लोकशाहीभिमुख व्हावा, तो लोकशाहीनिष्ठ व्हावा, येथे समानता नांदावी, येथील जातिभेद, धर्मभेद, पंथभेद नष्ट व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले परंतु काही घातक प्रवृत्तींनी देशद्रोही लोकांनी आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी कृती अवलंबिल्यामुळे अनेकदा देश संकटात आला पण त्याला धैर्याने आणि शौर्याने तोंड देण्यात आपण आतापर्यंत यशस्वी ठरलो आहोत, ही समाधानकारक गोष्ट म्हणावी लागेल.

या प्रजासत्ताकापुढे उभ्या ठाकलेल्या काही आव्हानांचा मी वर उल्लेख केलेला आहेच, पण देशांतर्गत काही समस्या अशा आहेत की त्या आव्हान बनून पुढे आल्या आहेत. आता हेच बघा ना. अयोध्येच्या श्रीराम मंदिराबाबत न्यायालयाचा अनुकूल निवाडा येताच याबाबत न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली आणि त्यात काही गैर आहे, असे मानण्याचे कारण नाही, पण याच लोकांची शबरीमलाबाबतचा न्यायालयाचा निर्णय मानण्याची मात्र तयारी नाही. हा दुटप्पीपणा नव्हे काय? तसेच केंद्रातील भाजप सरकारने निर्माण केलेला नागरिकत्व कायदा दुरुस्ती, नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या सूची यांबाबत देशातील अनेक भागात उत्स्फूर्त आंदोलने झाली. या आंदोलनांमध्ये काही ठिकाणी तर आंदोलकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. राष्ट्रीय संपत्तीची हानी झाली. यामुळे या गोष्टी आता आव्हाने बनून देशासमोर आल्या आहेत. दिल्लीत शाहीन बाग इथे रस्त्यावर येऊन आंदोलन करणार्‍या मुस्लिम स्त्रियांबद्दल भाजपच्या काही नेत्यांनी अश्लील उद्गार काढले, त्यातूनही राजधानी दिल्ली पोळून निघाली आहे. एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशवासियांनी आत्मनिर्भर बनावे म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत तर दुसर्‍या बाजूने कोरोनामुत होऊ घातलेला भारत निरनिराळ्या समस्यांनी चिंतायुक्त बनत आहे. यासाठी केंद्राने या सर्व बाबींवर गंभीरपणे विचार करून सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन सामोपचाराने तोडगा काढावा व आपला प्रजासत्ताक भारत चिंतामुक्त बनवावा, अशी विनंती कराविशी वाटते.