ती माणसं कुठं गेली?

0
158
  • ज.अ.ऊर्फ शरद रेडकर.

सांताक्रूझ वसंतराव तर कधीच निवृत्त झाले होते. पुढे त्यांचा संपर्क तुटला पण आनंदरावांच्या हृदयातील त्यांची मूर्ती ढळली नाही. आजही ते जुने दिवस आणि त्या गोड आठवणी त्यांच्या हृदयात रुंजी घालीत असतात.

माणसाच्या आयुष्यात प्रसंगानुसार अनेक माणसे येत-जात असतात. काही लक्षात राहतात तर काही विस्मृतीत जातात. काही विशिष्ट संस्काराने जी माणसे जोडली जातात त्यांची सोबत दीर्घकाळ टिकते किंवा टिकवावी लागते. कधी स्वतःच्या इच्छेने तर कधी परिवार, समाज आणि संस्कार यांच्या दडपणाने. उदाहरणार्थ- विवाह हा भारतीय संस्कृतीत समाजाचा पायाभूत बिंदू मानला जातो. म्हणूनच तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी विवाह करणार्‍यावर राहते. इतर नाती तुटली, दुरावली तर लोक त्याबाबतीत विशेष चर्चा करीत नाहीत मात्र एखाद्याने घटस्फोट घेतला तर त्याची आधी कुजबुज होते, मग दबक्या आवाजात बोलले जाते आणि नंतर त्याची उघड चर्चा सुरू होते. यात कधी संबंधित पुरुष दोषी मानला जातो तर कधी स्त्री! असो.

समाजशास्त्रात आपण नेहमी अभ्यासतो की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. अपवाद फक्त साधू संन्यासी यांचा! पण अलीकडे स्वतःला साधू, संन्यासी म्हणवणारे श्वेत किंवा भगवी वस्त्रे पांघरतात खरे पण ते पडद्यामागे संन्यस्त जीवन जगतातच असे नाही. काहींना राजकारणात येऊन नेतागिरी करायची खुमखुमी असते तर काहींना पंचतारांकित आश्रम उघडून भोळ्याभाबड्या लोकांना गंडवून सर्व सुखांचा उपभोग घ्यायचा असतो. यांना कोणी उलटा प्रश्‍न विचारला तर त्याला पाखंडी समजले जाते, (जसे अलीकडे सत्तेवर असलेल्यांना प्रश्‍न विचारले तर प्रश्‍नकर्त्याला देशद्रोही किंवा गद्दार समजले जाते.)
माणसाने कोणते उंची कपडे वापरले, अंगावर किती दागदागिने घातले, किती पंचपक्वानांचा आस्वाद घेतला यावरून त्याला लक्षात ठेवले जात नाही तर जन्माला येऊन तो इतरांशी कसा वागला, त्याने परिवारासाठी, समाजासाठी, देशासाठी कोणते चांगले काम केले यावरून आठवले जाते. दुष्ट, कुकर्म करणार्‍यांची नावे लक्षात राहात नाहीत असे नाही पण त्यांच्या नावांचा उच्चार करायलादेखील जीभ जड जाते. चांगल्या माणसांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते तर दुष्ट माणसाचे तिरस्काराने! रामायणातील रामाचे नाव आपण मोठ्या श्रद्धेने घेतो आणि रावणाचे रोषाने, पांडवांचे आदराने तर कौरवांचे रागाने! प्राचीन साधू संतांचे भक्तिभावाने तर चोर, लफंग्यांचे शिव्या देऊन! इतिहासात होऊन गेलेले महान नेते, शूर सेनानी, स्वातंत्र्य सैनिक यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण अभिमानाने साजरी करतो.

आनंदरावांच्या आयुष्यातही अशीच काही चांगली माणसं आली पण कारणपरत्वे ती दूर गेली. आनंदरावांच्या परिवारातील मोजकीच माणसं परंतु प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला. मुले वयात आली की ती आई-बापाचे ऐकत नाहीत. वृद्धत्वाकडे झुकलेला बाप तर त्यांना बुरसटलेल्या व मागास विचारांचा वाटू लागतो. कारण नवीन पिढी नवीन काळाच्या अधीन झालेली असते, आधुनिक जीवनशैली त्यांना खुणावत असते. म्हणूनच आई-वडिलांचे पारंपारिक आचार-विचार त्यांना मानवत नाहीत. आनंदराव नोकरीत असेपर्यंत आपल्या कामात सतत व्यस्त असत. त्यांचे कार्यालय त्यांना आपले दुसरे घर वाटायचे. घरच्यांपेक्षा त्यांना कार्यालय अधिक प्रिय वाटायचे. याचे कारण होते त्यांचे तिथले प्रेमळ सहकारी आणि आदरणीय वरिष्ठ अधिकारी. खेळीमेळीच्या वातावरणात रोजची कामे उरकली जायची. कार्यालयाचे संगणकीकरण झाल्याने तर कामे खूपच सोपी व सुटसुटीत झाली होती.
आनंदाराव कॉमर्स विषयाची पदवी घेतल्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेत चिकटले. ग्राहकसेवा हा बँकेचा कणा असतो. तुम्ही ग्राहकांशी जितक्या आपुलकीने वागाल आणि तत्परतेने सेवा द्याल तितका बँक व्यवसाय अधिक वाढतो. कोणत्याही आर्थिक आस्थापनाचे हेच सूत्र असते. खाजगी बँकेत ग्राहकांना जितकी चांगली सेवा मिळते तितकी राष्ट्रीयकृत बँकेत मिळत नाही असा सर्वसामान्य समज आहे. कारण सर्व सरकारी कार्यालयांच्या बाबतीत ‘हातावर टेकव दाम नाहीतर सहा महिने थांब’ अशी समजूत होऊन बसली आहे. अर्थात सर्वच ठिकाणी असे होत नाही. परंतु आंब्याच्या खोक्यातील एक आंबा कुजका निघाला की सारे आंबे नासून जातात तशातला हा प्रकार. आनंदरावांच्या बँकेत असा काही प्रकार नव्हता. त्यांचे सहकारी अतिशय सुसंस्कृत व सभ्य होते. बरेच जण त्यांच्या वयाचे होते तर काही वयस्कर होते. पण सर्वजण एकमेकांना मदत करीत. वातावरण सौहार्दपूर्ण होते. बँकेचे व्यवस्थापक श्री. वसंतराव अत्यंत वक्तशीर, रुबाबदार आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे होते. ते कधीच आपल्या केबिनमध्ये जास्त वेळ बसत नसत. सतत ते स्टाफच्या अवती भवती फिरून लक्ष ठेवीत. कुणाला कामात अडचण आली तर लगेच ती सोडवत. कधी कधी तर रजेवर असलेल्या माणसाचे काम ते त्याच्या काउण्टरवर बसून हाताळीत असत. कनिष्ट स्टाफला मार्गदर्शन करणे, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवणे, न चिडता त्यांच्या चुका दाखवून देणे, सर्वांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्या त्या दिवशी स्वतःच्या पैशातून केक आणणे, शुभेच्छा देणे या त्यांच्या उमद्या स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके अधिकारी झाले होते.

राष्ट्रीय बँक म्हटली की दर अडीच-तीन वर्षांनी व्यवस्थापकीय अधिकार्‍यांची बदली ठरलेली. काही वेळा मोठ्या शहरात, मोठ्या हु्‌द्यावर तर कधी नियम म्हणून असे घडत असते. वसंतरावांचीदेखील अशीच बढतीवर बदली झाली. त्यांना बढती मिळणार आणि ते दुसर्‍या शाखेत जाणार हे सर्वानाच अपेक्षित होते. परंतु पणजीहून थेट ते पंजाबला जातील असे कुणाला वाटले नव्हते. चंदीगड येथील मुख्य कार्यालयात प्रबंध अधिकारी पदावर त्यांना बढती देण्यात आली होती. आनंदराव आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना आपले साहेब एवढ्या दूर जाणार याचे वाईट वाटत होते. पण इलाज नव्हता. वसंतराव ना बढती नाकारू शकत होते ना बदली रद्द करू शकत होते. तो त्यांच्या करिअरचा प्रश्‍न होता. सर्व स्टाफने त्यांना अत्यंत प्रेमाने निरोप दिला.

आनंदराव अत्यंत हळव्या स्वभावाचे असल्याने आपल्या साहेबांचे बदलून जाणे त्यांच्या मनाला लागून राहिले. वसंतराव नवीन ठिकाणी गेले पण ते आपल्या पणजीच्या स्टाफला विसरले नाहीत. प्रत्येकाच्या वाढदिनी शुभेच्छा देणारा त्यांचा फोन यायचा! आज अशी माणसे, असे अधिकारी भेटणे फार कठीण झाले आहे. वसंतरावांच्या आठवणीने आनंदरावांचे डोळे भरून यायचे. काळ जसा पुढे सरकत जातो तशी जखमेवर पुटे चढतात, जखम भरते आणि वेदना शमते.

काळ कुणासाठी थांबत नाही. घड्याळाचे काटे पुढे सरकतच राहतात. सेवाज्येष्ठतेनुसार आनंदरावानादेखील बढती मिळाली आणि ते दुसर्‍या शहरात व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. वसंतरावांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने आनंदरावांनी त्यांचाच कित्ता गिरवला आणि ते देखील एक उत्तम बँक अधिकारी बनले. खूप वर्षे मागे पडली आनंदराव निवृत्त झाले. त्यांचे पूर्वीचे सहकारी बदली/बढती होऊन कुठे कुठे निघून गेले. वसंतराव तर कधीच निवृत्त झाले होते. पुढे त्यांचा संपर्क तुटला पण आनंदरावांच्या हृदयातील त्यांची मूर्ती ढळली नाही. आजही ते जुने दिवस आणि त्या गोड आठवणी त्यांच्या हृदयात रुंजी घालीत असतात.