देवभूमी नानोडा गाव व आदर्शवत पूर्वज

0
133
  • विशाल कलंगुटकर

नानोडा गावातील शैक्षणिक, समाजमनोभावना, परोपकारी वृत्ती आणि गावचा एकोपा अशा सामाजिक संरचनेच्या गाभ्याचे संस्कार त्या पूर्वजांनी गावाला घालून दिले. माणुसकी जोपासण्याचा हा स्वभावधर्मही गावातील देवदेवतांच्या सान्निध्याचाच प्रभाव मानला जात आहे.

निसर्गसंपन्नतेचा ठसठशीत ठसा उमटलेल्या नानोडा गावातील अनेक देवदेवतांच्या वासामुळे नानोडा गाव देवभूमी या संज्ञेला सार्थ ठरलेला आहे. त्याचबरोबर गावातील देवदेवतांच्या सान्निध्यात आपले जीवन समर्पित करताना गावात शिक्षण, सामाजिक मनोभावना, कष्ट, परोपकार, एकजूट आदी संस्कार घडविलेले गावचे पूर्वज आजही नवीन पिढीला आदर्शवत ठरलेले आहेत.

पोर्तुगीजांच्या वसाहतवादी जोखडात सुमारे साडेचारशे वर्षे म्हणजे गोमंतकीयांच्या पाच-सहा पिढ्या संपल्या. भारत देशाचा अविभाज्य भाग असलेला गोवा प्रदेश पोर्तुगिजांच्या जुलमी, हुकूमशाही राजवटीत बंदिस्त राहिला. जुलूम, जबरदस्ती, शारीरिक-मानसिक छळ आदी क्रौर्याचा कळस गाठणार्‍या पोर्तुगीजांनी अधिक तर हिंदूंचाच छळ केला. हिंदूंच्या मनोभावनांचे दमन करताना धर्मांध पोर्तुगीजांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली. पोर्तुगीजांचा जास्त प्रभाव असलेल्या गोव्यातील बार्देश, तिसवाडी, सालसेत या तालुक्यातील हिंदूंच्या मंदिरांकडे त्यांची वक्रदृष्टी वळली. हिंदूंच्या विरोधात क्रूरता दर्शविताना त्यांनी अनेक मंदिरे उध्वस्त केली. इतकेच नव्हे तर हिंदूंना जबरदस्तीने बाटवून त्यांना ख्रिस्ती करण्याचे प्रकारही त्यांनी केले. अशा आणीबाणीच्या काळात हिंदूंनी आपल्या प्राचीन, पवित्र सांस्कृतिक वारशाचे, धर्म संस्कृतीचे प्रतीक असलेल्या देवदेवतांचे नजीकच्या तालुक्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. बार्देश तालुक्यातील अनेक देवदेवतांचे निसर्ग, संस्कृतीसंपन्न व सुरक्षित अशा डिचोली तालुक्यात स्थलांतर झाले. डिचोली तालुक्यानेही आपल्या मातृतुल्य वात्सल्याचा आविष्कार घडविताना त्या अनेक देवदेवतांना आपल्या भूमीत सामावून घेतले. किंबहुना त्या स्थलांतरित देवदेवतांच्या अधिवासामुळे डिचोली तालुक्याचा प्रदेश पावनभूमी बनलेला आहे.
गोव्याच्या संस्कृतीला सागरासारखी व्याप्ती असून ती संस्कृती समृद्ध करणार्‍या भूमिपुत्रांनी त्यात नानाविध रंग भरले व गावांना लोकसंस्कृतीचा महान वारसा प्राप्त करून दिला. डिचोली तालुक्यातील नानोडा गाव अशाच स्थलांतरित देवदेवतांच्या अधिवासामुळे देवभूमी बनलेला आहे. कळंगुटची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण, कांदोळीची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कांदोळकरीण, बस्तोड्याचा ग्रामदेव श्री सत्पुरुष, हडफडेचा ग्रामदेव श्री चौरंगीनाथ, डांगी समाजाचे कुलदैवत श्री महालक्ष्मी, पिळर्णकरांचे देवस्थान आदी देवदेवतांचे पोर्तुगीज काळी नानोड्यात स्थलांतर झाले. इ.स. १७२० ते १७२५ या दरम्यान नानोड्यात देवदेवतांचे स्थलांतर झाल्याचे बोलले जाते.

नानोडा गावातील शैक्षणिक, समाजमनोभावना, परोपकारी वृत्ती आणि गावचा एकोपा अशा सामाजिक संरचनेच्या गाभ्याचे संस्कार त्या पूर्वजांनी गावाला घालून दिले. माणुसकी जोपासण्याचा हा स्वभावधर्मही गावातील देवदेवतांच्या सान्निध्याचाच प्रभाव मानला जात आहे. बदलत्या काळानुसार समाजातही बदल घडत गेले. असे असले तरी पूर्वजांनी घालून दिलेली सामाजिक धारणेची वीण कधीही विस्कटता कामा नये, ही मनोभावना नानोडा गावात आजही जोपासली जात आहे.
नानोडा गाव आणि परिसरात मराठी शिक्षणाचा पाया घालणारे गावचे दाजीबा मास्तर यांनी पोर्तुगीज काळात स्वतःच्या घराच्या ओसरीत मराठी इयत्ता चौथी पर्यंतची शाळा सुरू केली. ही मराठी शाळा बंद करण्यासाठी त्यांच्यावर अनेक दबाव आले. परंतु दाजीबा मास्तरांनी मराठी शाळेसाठी आपला अट्टाहास कायम ठेवला. दाजीबा मास्तरांच्या या शाळेत किमान दोन पिढ्या मराठी चौथीपर्यंत शिकल्या-सवरल्या. शिक्षणाबरोबरच गावात चांगले संस्कारही त्यांनी घडविले. मास्तरांच्या या शाळेत शिकून अनेकांनी आपले चारित्र्य घडविले. पोर्तुगीजांचा विरोध सहन करूनही दोन पिढ्यांपर्यंत मराठीचे शिक्षण देणार्‍या दाजीबा मास्तरांना मात्र त्यांच्या उतारवयात अनेक अपेष्टा सहन कराव्या लागल्या. उदरनिर्वाहाची बिकट परिस्थिती येऊनही त्यांनी आपला स्वाभिमानाचा मराठी बाणा किंचितही ढळू दिला नाही. अशा स्वाभिमानी बाण्याच्या दाजिबा मास्तरांचा दीन अवस्थेत अंत झाला. त्यांनी लावलेले ज्ञानदीप मात्र आजही स्वयंतेजाने प्रकाशत आहेत.

गोवामुक्तीनंतर पहिले मुख्यमंत्री बनलेल्या स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा प्रदेशाच्या गावागावात मराठी शाळा सुरू केल्या. नानोडा गावात आज ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहे त्या ठिकाणी प्रचंड टेकडी होती. ती जागा शाळेसाठी दिल्यानंतर त्या वेळच्या गावच्या धुरीणांनी श्रमदानाने टेकडी हटवून शाळा उभी राहण्यासाठी मोठे योगदान दिले. त्याकामी स्व. सखाराम लाडूजी नानोडकर, स्व. गणपत यशवंत कानोळकर, स्व. कृष्णा पुंडलिक वजरकर, स्व. दामोदर श्रीपाद केळकर आणि इतर अनेक ग्रामस्थ पुढार्‍यांनी बरेच प्रयत्न केले. गावात ज्ञानपीठ सुरू होत असल्याच्या जाणिवेने त्यांनी बरेच कष्ट उपसले. त्यांच्या आणि इतर सहकार्‍यांच्या घामा कष्टामुळे आज नानोडा गावातील विद्यालय दिमाखात वाटचाल करीत आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकरांनी सर्वच गावात लावलेले तत्कालीन ज्ञानदीप आजमितीस तेजाने प्रकाशमान झालेले पहावयास मिळत आहेत.

पोर्तुगिजांच्या जोखडातून साडेचारशे वर्षे इतका प्रदीर्घ काळ जुलूम सोसल्यानंतर गोवामुक्तीच्या बलीवेदीवर त्याग, हौतात्म्याच्या, बलिदानाच्या आहुतीमुळे मुक्तिसंग्रामाची बलिवेदी रक्तरंजित झाली. तेव्हा कुठे गोवा प्रदेश मुक्त झाला. त्या मुक्तीची फळे मात्र गेल्या साठ वर्षात गोमंतकीयांना नीटपणे चाखता आलेली नाहीत, हेही तितकेच खरे आहे. तथापि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवामुक्तीदिनाचा साठावा वर्धापनदिन शताब्दीच्या माध्यमातून साजरा करण्याचे घोषित केल्याने मुक्त गोमंतकीयांच्या मुक्त मनोभावनांना आता मात्र नवा आयाम प्राप्त होणार आहे, हे निश्चित!!