कोरोनाने राज्यात एकाचे निधन

0
259

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह एका रुग्णाचे निधन झाले असून नवीन १५० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ४९१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या १३१३ एवढी आहे. चोवीस तासांत २६४५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६८६ एवढी झाली आहे. दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात चिखली वास्को येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आणखी १५२ रुग्ण बरे झाले असून राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ४९२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के एवढे आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १२१ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन ३० कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
मडगाव परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ११२ एवढी आहे. वास्को येथे ७० रुग्ण, कुठ्ठाळी येथे ५१ रुग्ण, फोंडा येथे ९६ रुग्ण आहेत. पर्वरी परिसरात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. चिंबल येथे ७२ रुग्ण, शिवोली येथे ५१ रुग्ण, कांदोळी येथे ७९ रुग्ण आहेत.

दोन कॅसिनोत
दोन कोरोना रुग्ण
मांडवी नदीतील दोन तरंगत्या कॅसिनोमध्ये प्रत्येकी एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मांडवीतील दोन कॅसिनोमध्ये यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पणजी परिसरात नवीन ६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कॅसिनोतील दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शहरातील दोन हॉटेलमध्ये काम करणारे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. करंजाळे आणि ताळगाव येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. पणजीतील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या ८५ झाली आहे.