कोरोनाने आतापर्यंत १९२ बळी

0
144

>> सोमवारी ९ मृत्यू, नवे ४१४ पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ९ जणांचा बळी गेला आहे. कोरोना बळींची संख्या १९२ झाली असून कोरोना बळींचा आकडा दोनशेच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपला आहे. राज्यात नवे ४१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३६४९ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७,४१८ एवढी झाली आहे.

पाजीफोंड मडगाव येथील ६५ वर्षाच्या पुरुष रुग्णाला मृतावस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सोमवारी आणण्यात आला. त्या रुग्णाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांतइनेज येथील ६९ वर्षांचा पुरुष रुग्ण, रायबंदर येथील ८५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथे गोमेकॉमध्ये रविवारी निधन झाले. फोंडा येथील ५३ वर्षाच्या पुरुष रुग्ण, सांतइनेज येथील ७१ वर्षाच्या पुरूष रुग्ण, पश्‍चिम बंगालचा ५२ वर्षीय पुरुष रुग्ण, मेरशी येथील ५१ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथे गोमेकॉमध्ये काल निधन झाले. सावर्डे येथील ६८ वर्षाच्या महिला रुग्ण आणि एका अनोळखी पुरुष रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात रविवारी निधन झाले आहे.

३९१ कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह ३९१ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३,५७७ एवढी झाली आहे.
गोमेकॉच्या आयझोलेशन विभागात १२३ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने २००८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.