देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना जरी धोका असला तरी संसर्गाचा धोका कमी असेल, त्याचा परिणामही कमी असेल असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. जर लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्यात कोणतेही लक्षण नसेल किंवा अगदी अल्प स्वरूपात लक्षणे असतील. मात्र मुलांना रुग्णालयात दाखल करण्याएवढी परिस्थिती गंभीर नसेल असे डॉ. पॉल म्हणाले.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात सुरू असली तरी आता ओसरू लागलेली आहे. रुग्णसेख्येत हळूहळू घट होत असून ही लाट आता नियंत्रणात येत आहे असे डॉ. पॉल म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती मध्यम स्वरूपाची असेल असे तज्ज्ञ म्हणत आहेत. याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, विषाणूमध्ये परिवर्तन झाले तर लहान मुलांना ही लाट धोकादायक ठरू शकते.