कोरोनाची घसरण

0
265

गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून गेले काही दिवस कोरोनाच्या फैलावाने गोव्यासह देशामध्ये थोडी उसंत घेतल्याचे पाहायला मिळते आहे. मागील महिन्याच्या तुलनेत नव्या रुग्णांचे प्रमाण थोडेसे का होईना, खाली आल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. देशाचा विचार करता केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ आणि पश्‍चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मात्र अजूनही रुग्णसंख्या वाढतीच आहे. इतरत्र कोरोनाची लाट ओसरत असेल तर ती चांगलीच बाब आहे, परंतु हे आकडे फसवेही असू शकतात, कारण चाचण्यांचे प्रमाणही खाली आलेले आहे. साहजिकच पॉझिटिव्ह सापडणार्‍या रुग्णांचे प्रमाणही कमी दिसू शकते.
कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होण्याची गरज काही दिवसांपूर्वी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली होती. जास्तीत जास्त चाचण्या झाल्या असत्या आणि रुग्णांचे प्रमाण खाली आल्याचे दिसले असते, तर ती कोरोनाचा फैलाव कमी होत चालल्याची पक्की खूण मानता आली असती, परंतु येथे चाचण्यांचे प्रमाणही घटलेले आहे, त्यामुळे या आकडेवारीकडे सावधपणेच पाहिले पाहिजे. स्वतःमध्ये कोरोनाची अत्यंत सौम्य लक्षणे दिसताच लोक चाचणीसाठी न जाताच घरच्याघरी उपचार घेत असतील, किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली असेल तर इतर सदस्य पुन्हा स्वतःच्या चाचणीसाठी धावाधाव करण्याच्या फंदात न पडता थेट औषधोपचार सुरू करीत असतील, तर प्रत्यक्ष चाचण्यांचे प्रमाण कमी दिसू शकते. कोविड चाचणी न केलेल्या परंतु अत्यवस्थ होताच शेवटच्या क्षणी इस्पितळांमध्ये धाव घेऊन मृत्युमुखी पडलेल्यांची आपल्याकडील संख्या लक्षात घेतली तर वरील संभाव्यता अधिक दिसते. त्यामुळे आरोग्य खात्याच्या दैनंदिन आकडेवारीतील आकडे फसगत करू शकतात. परंतु तूर्त आपण ते सारे आकडे खरे असल्याचे मानून चा
कोरोनाच्या सततच्या नकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी सुखद आहे यात शंका नाही. मात्र, यातून पुन्हा बेफिकिरीचे पर्व सुरू होणार नाही आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आपण निमंत्रण देणार नाही ना, याचा विचार आता व्हायला हवा. देशातील व राज्यातील शैक्षणिक वगळता बहुतेक सर्व क्षेत्रे एव्हाना खुली झालेली आहेत. यापुढे लॉकडाऊन होणार नाही वा केले तरी त्याचा काही फायदा होणार नाही हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे ‘कोरोनासह जगणे’ हाच पर्याय सध्या तरी जनतेपुढे आहे. पण येणारे दिवस हे सणासुदीचे आहेत. सध्या नवरात्र सुरू आहे. दसरा, दिवाळी, नाताळ येईल. या उत्सवी धामधुमीमध्ये कोरोना ओसरल्याच्या भ्रमात आपण राहिलो तर ते घातक ठरू शकते.
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या दहा सदस्यीय तज्ज्ञ समितीनेही हाच इशारा दिलेला आहे. उत्सवाच्या या काळात जनता बेफिकिर व सरकारे बेफिकिर राहिली, तर एका महिन्याभरात देशात सव्वीस लाख नवे कोरोना रुग्ण निर्माण होऊ शकतात असा इशारा या नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील या तज्ज्ञ समितीने दिलेला आहे. म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांतील रुग्णसंख्येतील घसरण ही तात्पुरती ठरू शकते आणि कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असे या समितीला म्हणायचे आहे. त्यामुळे येणार्‍या सणासुदीच्या काळामध्येही कोरोनाबाबतच्या खबरदारीमध्ये कुठे उणीव येणार नाही वा बेफिकिरी होणार नाही हे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.
गोव्यामध्ये सध्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. ऐंशी टक्के हॉटेले एव्हाना भरली आहेत. पर्यटक हंगामाची ही तर सुरूवात आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत दरवर्षीप्रमाणेच पर्यटकांचे लोंढे येऊ लागले तर गोव्यातील परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. नाईट क्लबमध्ये चाललेल्या पार्ट्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली हे असले थेर चालणार असतील तर ते गोमंतकीय जनतेच्या जिवाशी खेळ मांडणारे होईल याची जाणीव सरकारने ठेवावी आणि या प्रकारांना आळा घालावा.
देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचा सामाजिक फैलाव झाल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नुकतीच दिली आहे. गोव्यातही ज्या प्रकारे नवनव्या ठिकाणी रुग्ण सापडू लागले त्यातून येथे कोरोनाचा सामाजिक फैलाव झाला आहे हे जनतेला केव्हाच कळून चुकले आहे. सध्या रुग्णसंख्या घटल्याने आरोग्ययंत्रणेवरील ताण थोडा कमी झालेला असेल, या संधीचा लाभ घेत राज्य सरकारने आपल्या आरोग्यविषयक सज्जता वाढविण्याची आवश्यकता आहे. गणेश चतुर्थीनंतर रुग्णांचे दैनंदिन प्रमाण दुप्पट झाले होते, तसे येणार्‍या दिवाळी वा नाताळच्या काळात होऊ नये यासाठी व्यापक कृतियोजना आखावी आणि कोरोनाला अटकाव करावा.