कोरोच्या पेनल्टीमुळे गोव्याची बंगळुरूशी बरोबरी

0
112

गतविजेता बंगळुरू एफसी आणि गतउपविजेता एफसी गोवा यांच्यात सहाव्या इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) लढतीत सोमवारी १-१ अशी बरोबरी झाली. आक्रमक खेळ करणार्‍या दोन्ही संघांमध्ये बंगळुरूने उदांता सिंगच्या गोलमुळे खाते उघडले होते, पण स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने पेनल्टी सत्कारणी लावली. त्यामुळे घरच्या मैदानावर भरपाई वेळेत पराभव टाळण्यासह एक गुण खेचून आणणे यजमान संघाला शक्य झाले.

दिवाळी धमाका अशी चर्चा झालेल्या लढतीने सुमारे १८ हजार प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवले. पूर्वार्धात दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. बंगळुरूची निर्णायक विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली. त्यांची ही सलग दुसरी बरोबरी आहे, तर गोव्याने एक विजय व एक बरोबरी अशा कामगिरीसह चार गुण मिळवून संयुक्त आघाडी घेतली. एका तासाच्या खेळानंतर कोंडी सुटली. मॅन्युएल ओन्वूने गोलरक्षकाच्या किकनंतर हेडिंग करीत चेंडू मागे नेला. उदांताने पहिल्याच प्रयत्नात गोव्याच्या मुर्तडा फॉलला चकविले. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाझचा अडथळा होता, पण उदांताने अचूक फटका मारला.

भरपाई वेळेत बंगळुरूचा युवा प्रतिभाशाली स्ट्रायकर आशिक कुरुनियन याने घोडदौड केली, पण कोरोमीनासने त्याला रोखत चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी कोरोमीनासचा पाठलाग करीत कुरुनीयन याने त्याला पाडले. हे पेनल्टी क्षेत्रात घडल्यामुळे पंच क्रीस्टल जॉन यांनी गोव्याला पेनल्टी बहाल केली. त्यावर कोरोमीनासने बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूचा अंदाज चुकवित लक्ष्य साधले.
पिछाडीनंतर पाच मिनिटांत गोव्याला बरोबरीची संधी होती. ६७व्या मिनिटाला फ्री किकवर ब्रँडन फर्नांडिसने मारलेला चेंडू मुर्तडा फॉलने उडी घेत हेडींग केला, पण त्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला.

पहिल्याच मिनिटाला बंगळुरूला कॉर्नर मिळाला. उजवीकडे मिळालेल्या कॉर्नरवर डिमास डेल्गाडोने जवळच असलेल्या निशू कूमारला पास दिला, पण निशू चेंडूवर नीट ताबा मिळवू शकला नाही.

सहाव्या मिनिटाला डावीकडून अहमद जाहौहने उजवीकडील सैमीनलेन डुंगलला सुंदर पास दिला, पण यावेळी डुंगल चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही. तीन मिनिटांनी मनवीर सिंगला मध्य क्षेत्रात चेंडू ताब्यात मिळाला. त्याने घोडदौड करणार्‍या डुंगलच्या दिशेने फटका मारला, पण बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने पुढे सरसावत बचाव केला. डुंगलने तेव्हा जास्त ताकदीने फटका मारला होता. पुढच्याच म्हणजे दहाव्या मिनिटाला बंगळुरूच्या उदांता सिंगने उजवीकडून सुनील छेत्रीच्या दिशेने क्रॉस पास दिला, पण गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझने उडी घेत चेंडू थोपविला. अर्ध्या तासाच्या सुमारास उदांताने उजवीकडून डिमासला मध्यभागी पास दिला, पण डिमासचा फटका स्वैर होता. बंगळुरूचा सर्वोत्तम प्रयत्न ३९व्या मिनिटाला झाला. कॉर्नरवर त्याने मारलेला चेंडू हवेतून भिरभिरत नेटच्या दिशेने गेला. त्यावर नवाझ चकला होता, पण डुंगलने चपळाईने उडी घेत हेडिंगकरवी चेंडू बाहेर घालविला.