‘कोजागरी’चा मंत्रजागर

0
175
  • मीना समुद्र

कोजागरीचा मंत्रजागर सांगतो- जागे रहा, जागृत रहा. मनाची दारे उघडा, निसर्गाकडे चला. अनुभवा त्याचा मुक्त, लोभस आविष्कार उन्मुक्तपणे. त्यातले चैतन्य, नवसृजनाची बीजे जागती ठेवा सतत. आपल्यासाठीच मांडलेल्या या खजिन्याची यथेच्छ लूट करा.

एका सुहृदानं दसर्‍याच्या शुभेच्छा पाठवताना ‘व्हॉट्‌सऍप’वर एक व्हिडीओ पाठवला. त्यात डोळे निवावेत असा एका बागेचा हिरवागार कोपरा होता. त्यात उभा एक पांढरा मोर दृष्टी खेचून घेत होता. फुललेल्या पांढर्‍याशुभ्र कापसाचाच केल्यासारखा दिसणारा तो मोर. चोच, तुरा, पायांपासून शेपटापर्यंत (पिसार्‍याच्या टोकापर्यंत) आनखशिख म्हणतात तसा तो पांढराशुभ्र मोर. शुभ्रवसना सरस्वतीचं वाहन म्हणून आपला एरव्हीचा झगमगता साजशृंगार उतरवून शारदोत्सवासाठी तिच्यासारखेच शुभ्रवसन लेवून आलेला तो मोर. मान लचकत तो पाचसहा पावले पुढे आला. मान वळवून थोडे इकडे-तिकडे पाहिले आणि मग मान उंच करून टाहो फोडला- मियॉंओऽऽ मियॉंओऽऽ. मग अंग थिरकवून त्याने आपला पिसारा उलगडला. शुभ्र तलम रेशमी पिसार्‍यावर शुभ्र रंगाचे डोळे आणि प्रत्येक पिसाच्या लांबच लांब उभवलेल्या दांड्यावर उगवत्या शुभ्र चंद्रकोरी. त्या बागेत फिरणार्‍या लोकांच्या तोंडूनच ‘वॉव’ स्पष्टपणे ऐकू आले. पिसारा फुलवलेला तो मोर थोडा इकडे, थोडा तिकडे नाचला आणि व्हिडिओ बंद झाला. या नवनवलनयनोत्सवाने दिपलेले मन किंचित थार्‍यावर आल्यावर खाली अभिप्राय लिहिला गेला, ‘शारदऋतूतल्या शारदोत्सवासाठी चांदणं पांघरून आलेला दिसतोय.’

खरोखरच, वाटत राहिलं की शुभ्रवसना सरस्वतीचा हा सेवक किंवा अश्‍विन पौर्णिमा कोजागरीचा हा अग्रदूत असावा. चंद्रप्रकाशात भिजलेल्या तलम चांदण्याने विणल्यासारखा त्याचा पिसारा आणि त्याला चार चॉंद लावणार्‍या त्या चंद्रकोरी. कोजागिरीच्या चांदण्यात अश्‍विनातलं पाऊसकालानंतरचं निरभ्र आकाश चंद्रप्रकाशाचा पसारा मांडून आणि चांदण्यांचा पिसारा फुलवून मनाला असंच आनंदविभोर करणारं; त्यासाठीचा हा शुभ्र शुभशकुन, हा शकुंतशकुन! मनावरची चांदणखूण!!

  • आणि मग आली कोजागिरी! ‘को जागर्ति’ म्हणत सर्वभर हिंडणारी लक्ष्मी- जागे असणार्‍यांच्या घरी धनवर्षाव करते. कर्मशील माणूस सतत जागा आणि जागृत असतो. अशा माणसावर ही धनधान्य, संतती, संपत्तीच्या रूपाने संतोषाचा वर्षाव करते. चांदण्याच्या शीतलतेचा प्रत्यक्षानुभव असाच प्रसन्न करणारा. सौंदर्याचा साज जीवनाला चढविणारा. कोजागिरी पौर्णिमेच्या सुरुवातीला सायंकाळी पश्‍चिमा रंगात न्हाऊन निघते. मग हळूहळू केशरी चंद्रबिंब वर वर चढत जाते. परातीएवढं असणारं हे चंद्रबिंब हळूहळू चंदेरी रंग धारण करतं. काळोख दाटत जाईल तसं ते जास्त तेजस्वी दिसू लागतं. आणि नंतर इथे-तिथे उगवलेल्या, उमटणार्‍या चांदण्या त्या प्रकाशाची उधळण करीत चांदणगीत गाऊ लागतात. हळूहळू मोगर्‍याचं लहडून झाड बहरावं तसं बहराला आणि भराला आलेलं चांदणं चंद्रप्रकाशात निथळून धरणीवर सांडतं आणि रुपेरी झिरझिरीत अवगुंठनात धरणी एखाद्या रूपसुंदरीसारखीच शोभून दिसू लागते. पावसासारखंच चांदणंही भेदभाव न करणारं.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया आकाशधरणीवर अवतरते ती अशी कोजागिरीच्या जादुगिरीने. जादूची कांडी फिरावी आणि अवघं रूप पालटून जावं तशी कोजागिरीच्या चांदण्याची किमया. नदी, सागर, जलाशयात हे चांदण्याचे आभाळ सांडते आणि त्याचा रूपधवल खळाळ चंद्रप्रकाशात खळाळतो, झळाळतो. रात्रीच्या नीरव समयी झाडे, फुले, पाने एरव्ही शांत, निःस्तब्ध उभी असतात. पण कोजागिरीच्या चांदणप्रहरी ती चंदेरी वर्ख अंगाला माखतात. एरव्ही चिडीचूप होणारी पाखरेही या चांदण्यात पंख फलकारत उजाडल्याच्या भासाने उडत राहतात. माणसांचे पाय आपोआप हे अनोखे सौंदर्य न्याहाळायला गच्चीवर, मोकळ्या मैदानात, सागर वा नदीतीराकडे वळतात. आप्तेष्टमित्रांच्या साथीने चांदणीरात्र आणखीनच रंगते. ‘रात है या बारात फुलों की’ असं गाणं ओठावर यावं इतकी चांदणफुलं आकाशात उगवलेली. कोजागिरीच्या अनोख्या सौंदर्याने भारावून जणू ती सुंदर, मुग्ध भावनांचे सुगंधी निःश्‍वास सोडतात. घरेदारे, डोंगरदर्‍या आणि कडेकपारी, दगडधोंडे सार्‍यांनाच ही चंदनउटी लागते आणि जादुई दुनियेचा भास सर्वत्र निर्माण होतो; हा भास नव्हे तर ते एक सत्य असते. कोजागरीचा मंत्रजागर मनात नाना प्रकारचे, कल्पनेचे धुमारे फुलवतो.

नवरात्रीपासून सुरू असणारा सर्व प्रकारच्या कलांचा आविष्कार संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, चित्र, शिल्प, वक्तृत्व अशा अभिव्यक्तीच्या नाना तर्‍हांनी आणि अशा अनंत अंगांनी कोजागिरीलाही घडतो. आणि अनंत आठवणींचे स्मरणरंजनही होते. या सार्‍यांचा जागर म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मीची आराधना आणि उपासना. कोजागिरी हा जणू या सर्वाचा कळसाध्याय. आनंदाने निथळत सर्वांचा आस्वाद घेता येतो. पावसाने झाकोळलेल्या दोनतीन पौर्णिमा सोडल्या तर आपल्या सार्‍याच पौर्णिमा अतिशय सुंदर. सगळ्याच पौर्णिमा मात्र अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या. पण कोजागिरी ही सर्वात स्वच्छ, निरभ्र, सुंदर, राजस आणि तेजस आणि सर्वात अधिक लोभस. त्यामुळे मोठी प्रसन्नतेची. धनधान्यसमृद्धी आणि सुसंपन्नतेचा हा काळ अगदी गोरगरिबांपासून तो श्रीमंतांपर्यंत सार्‍यांना समाधानाचा, थोडा मुक्ततेचा. कर्मशीलतेचं फळ सुंदर रूपात उपभोगण्याचा. म्हणून तर घरचे, दारचे सारे एकत्र येऊन मोठ्या आनंदात चांदण्याची मजा लुटत कोजागिरी साजरी करतात. घरातल्या ज्येष्ठांना ओवाळण्याची आणि भेटवस्तू देण्याची प्रथा ‘अश्‍विनी’च्या रूपाने पाळतात. कष्टाचे चीज आणि श्रमाची बूज राखण्याचे काम ही पौर्णिमा करते. कोजागिरीच्या चांदण्याच्या वरदहस्ताने मनही उदार, उदात्त, काव्यमय बनते. त्या चांदणस्पर्शाने सार्‍या सृष्टीला आणि माणसाच्या दृष्टीला नवीनता येते. त्याच्यातले अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. कोजागिरीच्या षोडष कलांनी युक्त अशा चंद्रबिंबात अमृत असते. आटीव दुधात वेलची, केशर घालून ते चंद्रप्रकाशात ठेवले की त्यात अमृतकण मिसळतात आणि ते अत्यंत आरोग्यदायी बनते. ज्याची सर्वच काळात अत्यंत आवश्यकता आहे, कारण आरोग्य हीच धनसंपदा आहे.
किती किती प्रकारे निसर्ग मानवकल्याणाच्या दिशा दाखवतो. कधी पाऊसधारा, हिरवा पसारा, कधी उन्हाचा झळाळ तर कधी चांदण्याची शीतलता. हे सारे सर्वांगानी अनुभवताना दृष्टी विशाल होते. उदार होते. प्रसन्नता, मुक्तता आणि असीम शांतीचा प्रत्यय निसर्गातच येतो. म्हणून कोजागरीचा मंत्रजागर सांगतो- जागे रहा, जागृत रहा. मनाची दारे उघडा, निसर्गाकडे चला. अनुभवा त्याचा मुक्त, लोभस आविष्कार उन्मुक्तपणे. त्यातले चैतन्य, नवसृजनाची बीजे जागती ठेवा सतत. आपल्यासाठीच मांडलेल्या या खजिन्याची यथेच्छ लूट करा. कार्यरत व्हा. दुसर्‍याचाही विचार करा. कर्तव्य आणि ध्येयाप्रती प्रामाणिक रहा. एकेका तेजस चांदणीसारखे गुण अंगी बाणवा. सुखी व्हा, संपन्न व्हा.