कोकणी-मराठी शाळांना अर्थसहाय्यावरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले मार्गदर्शन

0
130

>>साधन सुविधांवरील खर्चाच्या तरतुदीचे आश्‍वासन

कोंकणी किंवा मराठीतून प्राथमिक शिक्षण देणार्‍या शाळा व्यवस्थापनांना आवश्यक त्या पायाभूत सुविधांसाठी प्रती विद्यार्थ्यांमागे दरमहा ४०० रुपये आर्थिक मदत देण्याच्या योजनेची जूनपासून सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर काल शिक्षण खात्याने बोलावलेल्या शाळा व्यवस्थापकांचा बैठकीत शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल मार्गदर्शन केले. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या व्यवस्थापनांचे मिळून २५ प्रतिनिधी उपस्थित होते.
यापूर्वी सरकारने १२ लाख रुपयांची एकरकमी मदत योजना जाहीर केली होती. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवस्थापकाला आलेल्या अडचणी, तसेच अंमलबजावणीसाठीही येत असलेल्या समस्येची माहिती मुख्यमंत्री पार्सेकर व शिक्षण संचालकांनी व्यवस्थापकाना दिली.
खर्चाच्या तरतूदींचा सहानुभूतीपूर्ण विचार
शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, परीक्षांसाठी लागणारे साहित्य, कारकून, सफाई, सुरक्षा यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूद करण्यासंबंधी आलेल्या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. नवीन योजनेखाली मिळणारी रक्कम, बांधकाम, इमारतीचे नूतनीकरण, संडास, मैदान आणि कुंपण, फर्निचर, संगणक, शैक्षणिक साधनांची खरेदी, वाचनालयासाठी पुस्तकांची खरेदी, दृकश्राव्य माध्यमे, स्टेशनरी, रु. १५ हजारपर्यंत वॉटर प्युरीफायरवर खर्च, वीजेचे सामान, पाणी व वीज बील त्याचप्रमाणे साबण, प्रथमोपचार यावर येणार्‍या खर्चासाठी तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिक्षकांनी व व्यवस्थापनांनी दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. डॉ. के. ब. हेडगेवार सारख्या विद्यालयात मराठी वर्गात प्रवेश घेण्यासाठी गर्दी असते, असे एका प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचवेळी ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात पाठविण्याकडे कल असतो, असेही एका प्रतिनिधीने सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दर्जात्मक शिक्षण दिल्यास पालक विद्यार्थ्यांना कोकणी किंवा मराठी माध्यमात पाठवतात, असे सांगून आपल्या हरमल येथील शाळेचे मुख्यमंत्र्यांनी उदाहरण दिले. या विषयावरील पुढील बैठक जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे सांगितले. व्यवस्थापकाच्या काही सूचना असल्यास त्या दि. २७ एप्रिलपर्यंत खात्याला सादर कराव्यात, असे आवाहन संचालक गजानन भट यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत पांडुरंग नाडकर्णी, प्रशांत नाईक, म्हाळसाकांत देशपांडे, कुमार सरज्योतिषी, राजेश पाटणेकर, चंद्रकांत हेदे, रामचंद्र गर्दे आदींनी भाग घेतला.