– लाडोजी परब
शिमगोत्सव म्हणजे उत्सव आणि परंपरेचा अनोखा संगम! कोकणातील सारी गावे शिमगोत्सवात भारून जातात. शिव्यांच्या ओव्या होतात. ‘शबय’चा हक्क प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. देवतरंगांची स्वारी रयतेला भेटण्यासाठी वाडीवस्तीत पोहोचते. चव्हाटा हे गावचे व्यासपीठ बनते. होळीचे सात ते नऊ दिवस रंगून जातात. ढोल-ताशा बडवणारे वाजंत्री, तर्हेतर्हेच्या रंगांची उधळण, रंगात न्हाऊन निघालेले रोंबाटकारी, उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी बच्चे कंपनी… हे चित्र शिमगोत्सवात कोकणातच पाहावयास मिळते. नेरूरचे रोंबाट, कुणकेरीचा हुडोत्सव, साळगावचे गडे, कारिवडे, माडखोलचे खेळ हे शिमगोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणाव्या लागतील.
आकेरी (ता. कुडाळ) ची होळी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. आकेरी घाडीवाडीलगत गावातील सर्वांनी एकत्रितरीत्या जमून होळी उत्सव साजरा करण्यात येणारा चव्हाटा आहे. या चव्हाट्यावर होळी पौर्णिमेस भेडल्या माडाची उंचच उंच होळी उभारली जाते. होळीलगत स्थापना केलेल्या घटात गावठी दारू ओतून बळी देऊन त्याचा रक्ततिलक घटाला लावला जातो. होळीच्या चौथ्या दिवशी पहाटे ४ वा.च्या दरम्यान ‘सती’ कार्यक्रम सुरू होतो. या कार्यक्रमाची खरी सुरुवात घाडी, गावडे, खामरेकर, परब, सावंत, लंगवे, राऊळ या सात प्रमुख रोंबाटकारांच्या मांडावर पहाटे ३ गोवर्या रचून गड बनवून होते. हे धावणारे गडे या गोवर्यांनी बनविलेल्या गडाकडे एकत्र येतात. यातील दोघेजण दगडावरील तर उर्वरित दोघे चिंचेजवळील गडाकडे थांबतात. या गडांना आग लावली जाते. घटासमोर समाजाचे नेतृत्व करणार्या गावच्या गावकारास हिरवी साडी नेसवून सुगंधी फुले त्याच्या केसांत खोवून हातातील ताटात ओटीचे साहित्य दिले जाते. या सुवासिनीला सर्व रोंबाटकारी ढोल-ताशे वाजवत या गडाकडे हळहळू आणतात. त्यावेळी गडावर उपस्थित असलेले चारही गडे एकमेकांवर या जळत्या गोवर्या फेकतात. एकमेकांना जखमी भाजून घेण्याचा शर्थीचा प्रयत्न केला जातो. ‘हरहर महादेव…’ अशी गर्जना करून गड लुटीचे डावपेच सुरू होतात. याठिकाणी सुवासिनीला आणून हा धगधगता गड दाखविला जातो. या गडाच्या विरुद्ध २०० ते ३०० मी. अंतरावर पालापाचोळा, सुकी झाडे आणून ठेवली जातात. ती व्यवस्थित चितेप्रमाणे रचून त्याला गावडे आग लावतात. सती जाणार्या या सुवासिनीस चव्हाट्यास प्रदक्षिणा घालून वाजतगाजत गडांकडून या कवळाच्या पेटविलेल्या चितेजवळ आणले जाते. हे सरण दाखवून सती झालेल्या गावकरास सरणाभोवती रोंबाटकार्यांमध्ये घेऊन पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना उपस्थितांतून शोकगीतांची आळवणी होते. सरणाशेजारील उंच भागावर या सुवासिनीला उभे केल्यानंतर सदर सुवासिनी पेटत्या सरणात सर्वप्रथम हातातील ओटी टाकून सरणाच्या आगीच्या ज्वालांवरून पलीकडे उडी घेत चितेकडे फिरून न बघता सती झालेली व्यक्ती काळोखातून घरी पसार होते. सर्व रोंबाटकारी आपापल्या मांडावर परत चव्हाट्यावरून जाण्यास निघतात. तोपर्यंत पहाटेचे ५.३० वाजलेले असतात. सुवासिनीने उडी घेतलेल्या गावकरास ‘सती’ असे संबोधले जाते. येथेच या कार्यक्रमाची सांगता होते.
कुंदूस कुंदूस बया रडते
घरी येतेस की नाय गं
पायातली पैंजण तुला देते
घरी येतेस की नाय गं…
हातातली अंगठी तुला देते
घरी येतेस की नाय गं
या गीताबरोबरच काही ऐतिहासिक तर काही मार्मिक गीतांचे सूर शिमगोत्सवात घुमतात. काही सोंगे अक्षरश: धिंगाणा घालतात. शिमगोत्सव म्हणजे लोकोत्सवाचे मोठे व्यासपीठ. कोकणातल्या अनेक गावांमध्ये होळी पेटविण्याऐवजी आंब्याची पाने बांधून उंचच उंच होळी घालण्याची परंपरा आहे. होळीच्या आदल्या दिवशीपासून मांडावर तमाशा रंगू लागतो. जसजसे तळकोकणाकडे सरकावे तसे शिमगोत्सवाचे रूपडे वेगळे भासते. नारूरचे रोंबाट तर जगप्रसिद्ध आहे. शिमग्याच्या दिवशीपर्यंत आपली चित्रे कशी आहेत, कोणती आहेत याचा ठावठिकाणा लागू नये याची प्रत्येकजण दखल घेतो. सह्याद्रीत जशी डफावर थाप मारल्याशिवाय शिमगोत्सव रंगत नाही तसा घुमटावर हात मारल्याशिवाय वेेंगुर्ल्यात शिमग्याला रंग चढत नाही. शिमग्यात पालखी नाचविण्याचा प्रकार खारेपाटणपासून रत्नागिरीपर्यंत पाहावयास मिळतो. दोडामार्ग तालुक्यात घोडेमोडणीची अनोखी परंपरा आहे. घोड्याचे मुखवटे कंबरेला बांधून तलवारी अशा काही फिरवल्या जातात जणू घोडेस्वारांचे हे रणमैदान! शिमगोत्सवात लावण्यवती नाचते पण ते काम करणारा पुरुषच असतो. ‘राधे तुझा रंग पाहुनी हरी दंग झाला’ यासारख्या गीतांबरोबरच कोपरखळी, कुठे मार्मिक संवाद आणि बतावणी याचा अनोखा संगम येथे पाहावयास मिळतो. शिमगोत्सवात चव्हाट्याला महत्त्व असते. येथील घडामोडी लक्षवेधी असतात. होळीला नारळाची तोरणे लगडतात. याच काळात दान धर्माची परंपरा वाढीस लागते. कारण शिमगोत्सवात ‘शबय’ मागणे हा प्रत्येकाचा हक्क असतो. सात दिवस दिमाखदार सोहळा रंगतो. प्रथेप्रमाणे पारधहोते. आणि देवाच्या आगमनाची तुतारी फुंकली जाते. घराघरात निशाण फिरते. आणि देव माघारी फिरतात. तिन्ही सांजेला ढोलांचा विशिष्ट नाद घुमतो. हे दिवस म्हणजे गार्हाण्यांचे, समस्त देवांना साकडे घालणार्यांचे असतात. या सामाजिक परंपरेतून गावातील एकोपा वाढण्यास मदत होते. या परंपरेमागचे विज्ञान लक्षात घेता सामाजिकतेतून विचार करता गावची चौकट चव्हाट्यावर ठरते. शेवटच्या दिवशी अर्थात धुळवडीदिवशी गार्हाणे घातले जाते. सारा गाव यावेळी चव्हाट्यावर उपस्थित असतो. …बाबा लिंगा, गांगो, बाराच्या पूर्वसा, वशिका, ब्राह्मणा, उगवाई, काळकाई, इटलाई, नवलाई, सातेरी, माऊली, कुळकार, थळकारा, होळीच्या चाळ्या, होळद्या…. खड्या आवाजात हे गार्हाणे सुरू असताना प्रत्येक गावकरी ‘होय म्हाराजा’ म्हणून त्याला दाद देत असतो. गार्हाणे घातल्यानंतर चव्हाट्यावर विविध भागातून आलेले रोमटामेळ ढोल, ताशांच्या गजरात बेधुंद नाचतात. त्यात आबालवृद्ध सहभागी होतात. अलीकडे बँजोच्या तालावर रोमटामेळ फेर धरू लागले आहेत. त्यातून पारंपरिक वाद्ये नाहीशी होत असल्याचे चित्र दिसते. रोंबाट संपेपर्यंत रात्रीचे १२ वाजतात. दुसर्या दिवशी देवाचा मांड आणि न्हावण प्रत्येकाच्या घरात जाते. तीर्थ घेण्यासाठी प्रत्येकाची अंगणे शेणाने सारवलेली असतात. तुळशीवृंदावनासमोर मांड दाखल झाल्यानंतर न्हावण घेऊनच गावच्या शिमगोत्सवाची सांगता होते.