कॉंग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड लांबणीवर : चोडणकर

0
7

कॉंग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड सध्यातरी लांबणीवर पडली आहे, असे काल माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेमध्ये पक्षाचे केंद्रीय स्तरावरील सगळे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे गोव्यातील कॉंग्रेस विधिमंडळ नेत्यांची निवड सध्या तरी लांबणीवर पडली आहे. खरे म्हणजे आतापर्यंत ही निवड होणार होती. मात्र, केंद्रीय नेते मुकूल वासनिक तसेच पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे या घडीला भारत जोडो यात्रेमुळे व्यस्त आहेत. त्यामुळे ते गोव्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच गोव्यातील कॉंग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे, असे चोडणकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
मात्र, असे असले तरी पुढील आठवडाभरात ही निवड होऊ शकते, असे चोडणकर पुढे बालताना म्हणाले.

दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा व दक्षिण गोव्याच्या उमेदवारांची निवड करण्यासंबंधी बोलणी सुरू झाली आहे का, असे विचारले असता अजून तरी त्यासंबंधी बोलणी झाले नसून योग्य वेळी सगळे काही होणार असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

भारत जोडोमध्ये गोव्यातून
१००/१५० कार्यकर्ते सहभागी
कॉंग्रेस पक्षातर्फे येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जी ‘भारत जोडो’ परिक्रमा सुरू करण्यात आलेली आहे ती भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या चळवळीत हजारो लोक सहभागी होणार आहेत व गोव्यातून किमान १०० ते १५० कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी श्री. चोडणकर यांनी दिली.

गोव्यातून जाणारे कार्यकर्ते हे एक तर महाराष्ट्र राज्यात अथवा कर्नाटक राज्यात या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. गोव्यातून या यात्रेत जास्तीत जास्त पक्ष कार्यकर्ते व पक्ष समर्थक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे चोडणकर म्हणाले.

आपण व्यक्तिश: किमान दोन ते वेळा या यात्रेत जाऊन तीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या यात्रेत जाऊन पक्षाचे हात बळकट करण्याची गरज आहे. देश सध्या खूप कठीण परिस्थितीत आहे. देशाला वाचवण्यासाठीच या यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.