कॉंग्रेस आमदार अपात्रता निवाडा पुन्हा लांबणीवर

0
248

>> सभापतींनी एक याचिका फेटाळली

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये गेलेल्या १० आमदारांवरील अपात्रतेसंबंधीचा कॉंग्रेसचा एक अर्ज काल सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळला. तसेच अपात्रता अर्जावरील निवाडा कालांतराने देण्यात येणार असून त्यासंबंधी संबंधीत याचिकादारांना कळवण्यात येणार असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले.

१० कॉंगे्रस आमदार २०१९ साली कॉंगे्रस पक्षातून फुटले होते व नंतर त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सभापतींनी आम्हाला काल सुनावणीसाठी बोलावले होते. आम्ही केलेल्या अर्जापैकी एका अर्जावर सभापतींनी निर्णय घेतला असल्याचे आम्हाला कळवण्यात आले होते, असे काल अर्जदार गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्ष हा अधिकृत पक्ष असून गोव्यात तो अस्तित्वात आहे याचे पुरावे सभापतींना सादर करण्यासाठी आम्ही सभापतींसमोर अर्ज केला होता. आम्ही सदर पुरावे माहिती हक्क कायद्याखाली मिळवले असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. राज्यात कॉंग्रेस पक्ष अस्तित्वातच नसल्याचा भाजपचा दावा खोडून काढण्यासाठी हे पुरावे देणे महत्वाचे होते. मात्र, सभापतींनी आम्ही त्यांच्याकडे त्यासाठी केलेला अर्जच फेटाळल्याचे चोडणकर म्हणाले.

ही न्यायालयाची थट्टा : चोडणकर
दहा आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेच्या आदेशास विलंब लावून सभापती राजेश पाटणेकर हे सर्वोच्च न्यायालयाची खिल्ली उडवत असल्याचा आरोप काल गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. तसेच संविधानाचा आदर न करणार्‍या पाटणेकर यांना सभापतीच्या असनावर बसण्याचा अधिकार नसल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

अशा याचिकांवर तीन महिन्यांच्या आत निकाल देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना गेल्या २० महिन्यांपासून या अपात्रतेच्या याचिकेवर आदेश देण्यास सभापती उशीर करीत आहेत हे धक्कादायक असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.