कॉंग्रेसला ब्लॅकमेल करण्याचा सरकारने प्रयत्न करू नये

0
85

जेटलींच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेसचा हल्लाबोल
विदेशी बँकांमधील काळ्या पैशासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्यामुळे घायाळ झालेल्या कॉंग्रेसने त्यांच्यावर काल हल्लाबोल केला. हिंमत असल्यास या प्रकरणी संपूर्ण माहिती जाहीर करावी असे आव्हान कॉंग्रेसने मोदी सरकारला दिले.विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडविल्याप्रकरणी गुंतलेल्या भारतातील खातेधारकांची काही नावे सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार असून त्यामुळे कॉंग्रेसची स्थिती अडचणीची होईल असे वक्तव्य जेटली यांनी मंगळवारी केले होते. जेटली यांनी कॉंग्रेसला ब्लॅकमेल करणे थांबवावे व संपूर्ण माहिती उघड करावी असे आव्हान कॉंग्रेसने दिले.
व्यक्तींपेक्षा पक्षश्रेष्ठ असल्याचे कॉंग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले. केवळ १३६ नावेच उघड न करता गुंतलेल्या सर्वांची नावे जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारने अर्धसत्य आणि निवडक माहिती उघड करणे असे प्रकार टाळावेत अशी सूचना माकन यांनी केली आहे. या प्रकरणात जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. मात्र अर्धसत्यावर आधारीत कोणालाही लक्ष्य केले जाऊ नये असे ते म्हणाले. कॉंग्रेसला ब्लॅकमेल करण्याचा सरकारने प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी दिला.