कॉंग्रेसला खिंडार, दोन आमदार भाजपात

0
123
दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांना दिल्लीत भाजप मुख्यालयात प्रवेश दिल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विश्‍वजित राणे, विनय तेंडुलकर व श्रीपाद नाईक.

दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकरांचे राजीनामे

पणजी/प्रमोद ठाकूर
कॉंग्रेस पक्षाचे शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर आणि मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी काल नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोघांना मंत्रिपदे देण्यासाठी विद्यमान मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला डच्चू द्यावा लागणार आहे. या नवीन घडामोडीमुळे राजकीय परिस्थिती एका नवीन वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणार्‍या कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या असून सत्ताधारी भाजपने कॉंग्रेसला खिंडार पाडत आम्ही पाच वर्षे राज्य करू असा दृढ विश्‍वास व्यक्त केला आहे.
आमदार शिरोडकर आणि आमदार सोपटे यांनी नवी दिल्ली येथून आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारी पत्रे फॅक्सद्वारे गोवा विधानसभा सचिवालयाकडे दुपारी पाठविली. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी फॅक्सद्वारे प्राप्त झालेल्या राजीनामा पत्रांबाबत दोन्ही आमदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून राजीनामा पत्रांबाबत खातरजमा केल्यानंतर दोघांचे राजीनामे स्वीकारले.
भाजपकडून नेत्याची चाचपणी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे राज्यात राजकीय पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपकडून नवीन नेता निवडण्यासाठी चाचपणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षात फूट पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे कॉंग्रेसचे आमदार शिरोडकर आणि सोपटे यांचे मन वळविण्यास यशस्वी ठरले आहेत.
कॉंग्रेसचे शिरोडकर आणि सोपटे यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामे सादर केले. शहा यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री राणे यांची उपस्थिती होती.
कॉंग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर पक्षांतर करणार अशी चर्चा मागील वर्ष – दीड वर्षापासून राजकीय वर्तुळात सुरू होती. कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचा खुलासा शिरोडकर यांच्याकडून केला जात होता. शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या समर्थकांशी चर्चा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिरोडकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता भाजपचे माजी आमदार, मंत्री महादेव नाईक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभापतींनी राजीनामे स्वीकारले
कॉंग्रेस पक्षाचे आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर या दोन आमदारांचे राजीनामे फॅक्सद्वारे प्राप्त झाल्यानंतर दोन्ही आमदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून राजीनामा पत्राबाबत खातरजमा करून घेतली. दोन्ही आमदारांनी कुणाच्या दबावाखाली न येता स्वतःहा आमदारकीचे राजीनामे दिल्याने राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. राजीनामा पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबतची माहिती सभागृहाचे सर्व सदस्य, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे. विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांच्या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सभापती डॉ. सावंत यांनी दिली.
नवी दिल्लीत भाजप प्रवेश
कॉंग्रेसचा त्याग केलेल्या माजी आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला आहे. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दोन्ही माजी आमदारांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची उपस्थिती होती.
कॉंग्रेसचे संख्याबळ घटले
दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस पक्षाला आता विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा करता येणार नाही. विधानसभेतील कॉंग्रेसचे संख्याबळ १४ वर आले असून भाजपचे संख्याबळसुद्धा १४ एवढे आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला १७ जागा मिळाल्या होत्या.
कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापन करणे शक्य न झाल्याने कॉंग्रेसच्या तिकिटावरून वाळपई मतदारसंघातून निवडून आलेल्या विश्‍वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळविले होते. त्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ १६ वर आले होते. आता, दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ १४ वर आले आहे.