कॉंग्रेसजनांनी सामूहिकरित्या तृणमूलमध्ये जावे

0
23

>> खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा व्हिडिओ व्हायरल

कॉंग्रेस पक्षात सगळे काही आलबेल नसून पक्षांतर्गत भांडणे व हेवेदावे चालूच आहेत हे काल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा एक अत्यंत वादग्रस्त असा व्हिडिओ ‘लिक’ झाल्यानंतर स्पष्ट झाले.

या व्हिडिओत सार्दिन हे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना उद्देशून अनुद्गार काढत असल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. सर्व कॉंग्रेसजनांनी सामूहिकरित्या राजीनामे देऊन तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा, असे आवाहनही सार्दिन यांनी वरील व्हिडिओद्वारे केले आहे. हा व्हिडिओ ‘लिक’ होऊन समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर गोंधळून गेलेल्या सार्दिन यांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना ते विधान आपण अनौपचारिकरित्या केल्याचा खुलासा केला. ते आपले अधिकृत विधान नाही असे सांगण्यासही ते यावेळी विसरले नाहीत. सार्दिन यांना कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती केलेली नको असून पक्षश्रेष्ठींनी या युतीला हिरवा कंदील दाखवल्याने सार्दिन यांचा तिळपापड झाला असल्याचे कॉंग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंबंधी चोडणकर यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ह्या व्हिडिओची सत्यासत्यता पडताळून पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देणे हे योग्य ठरणार नसल्याचे म्हटले आहे.

ऍथेल लोबो तृणमूलमध्ये
युवा कॉंग्रेस नेत्या व मडगावच्या माजी उपनगराध्यक्ष ऍथेल लोबो यांनी काल रितसर तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षात सध्या भाजपधार्जिण्या लोकांचाच जास्त भरणा असून तेथे महिलांना स्थान नसल्याचा आरोप लोबो यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या एक लढवय्या नेत्या असून त्यांचे कार्य, त्यांची जिद्द व त्यांची साधी राहणी हे गुण पाहून आपण प्रभावित झाल्याचे लोबो म्हणाल्या. पं. बंगालमध्ये भाजपचा त्यांनी एकहाती पराभव केल्याचे लोबो म्हणाल्या. तृणमूल कॉंग्रेस पक्ष जर राज्यात सत्तेवर आला तरच राज्यात नवी पहाट उगवेल असा विश्‍वासही यावेळी लोबो यांनी व्यक्त केला. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या खासदार व पक्षाच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.