कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचे नाव आघाडीवर

0
10

>> राजस्थान, दिल्लीनंतर छत्तीसगड समितीचा ठराव

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी अशी मागणी सध्या जोर धरत आहेत. राहुल गांधी हे सध्या पक्षाच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत.

राजस्थान आणि दिल्ली राज्य समित्यांनंतर काल रविवारी छत्तीसगड कॉंग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. शनिवारी हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. पक्षाच्या राज्य मुख्यालय राजीव भवन येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुला गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे म्हटले आहे.

राजस्थान कॉंग्रेसचा प्रस्ताव
श्री. बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजस्थान कॉंग्रेस समितीकडून आला आहे. छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे जिथून हा प्रस्ताव जात आहे. असे प्रस्ताव इतर राज्यांतील समितींकडूनही येण्याची शक्यता असून तसे झाल्यास राहुल गांधींना अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचा विचार करावा लागेल असे म्हटले आहे.

अर्जांसाठी अधिक नावे
कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू असून कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, आनंद शर्मा आणि भूपेंद्र हुडा हे जी-२३ नेते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, कॉंग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष निवडीची अधिसूचना जारी झाल्यानंतर २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.