कॉंग्रेसचे पी. चिदंबरम् गोव्यात दाखल

0
50

>> विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार

गोवा विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेसने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांचे काल बुधवारी सकाळी ११ वाजता गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद करणे टाळत त्यांनी नंतर सविस्तर बोलेन असे उत्तर दिले. चिदंबरम् दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर आले आहेत. चिदंबरम यांच्यावर गोव्यातील निवडणुकीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दाबोळी विमानतळावर चिदंबरम् यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, लुईझिन फोलेरो, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर, माजी वीजमंत्री ऍलेक्स सिक्वेरा, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी मंत्री मिकी पाशेको व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लूईझिन फालेरो यांनी चिदंबरम् यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

चिदंबरम् यांच्या या दौर्‍यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा फॉरवर्डसोबत युती याबाबत विचार होणार आहे. १ सप्टेंबरपासून उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू करणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या एका नेत्याने दिली.

विविध पदाधिकार्‍यांशी केली चर्चा

गोव्यात दाखल झालेले कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये काल बुधवारी सकाळी कॉंग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. उत्तर गोव्यातील गट अध्यक्षांशीही त्यांनी येऊ घातलेली निवडणूक व त्या अनुषंगाने त्यांनी हाती घ्यायच्या असलेल्या कामांविषयी माहिती देतानाच मार्गदर्शन केले.

महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवा दल, कॉंग्रेसप्रणीत एनएसयूआय विद्यार्थी संघटना आदि संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी चिदंबरम यांची भेट घेतली. सायंकाळी पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार तसेच प्रदेश कॉंग्रेस समितीवरील पदाधिकार्‍यांशी चिदंबरम यांनी संवाद साधला. चिदंबरम हे आज आज गुरुवारी दक्षिण गोव्यातील कॉंग्रेस पदाधिकार्‍यांना इंटरनॅशनल सेंटरमध्ये भेटणार आहेत.