>> मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ हजारो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर
कॉंग्रेसने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानावर आयोजित केलेली सद्बुद्धी यात्रा साखळीत भाजप कार्यकर्त्यांनी रोखली. कॉंग्रेसच्या या सद्बुद्धी यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या समर्थनासाठी सुमारे अडीच हजारांहून अधिक भाजप कार्यकर्ते एकवटले. त्याचवेळी दुसर्या बाजूने कॉंग्रेसचे सुमारे पाऊणशे ते शंभर कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र ही यात्रा मुख्यमंत्र्यांच्या घरी आलीच नाही.
कॉंग्रेसची ही यात्रा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर येणार असल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळा झाले. त्यानंतर तेथून ते इस्पितळाजवळ घोषणा देत आले. यावेळी एका बाजूला कॉंग्रेस कार्यकर्ते तर दुसर्या बाजूला भाजप कार्यकर्ते जमा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या पोलिसांनी कॉंग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांना दोन्ही बाजूंनी रोखून धरले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत महिला सुरक्षेबाबत केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन केले. कॉंग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कॉंग्रेस नेत्यांचे पुतळेही जाळण्यात आले.
दुसरीकडे कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर, प्रताप गावस, धर्मेश सगलानी, खेमलो सावंत, प्रवीण ब्लेगन, महादेव खांडेकर, वरद म्हार्दोळकर, विजय भिके, सुनिता वेरेकर, दशरथ मांद्रेकर, मंगलदास नाईक, बिना नाईक, रेणुका देसाई व इतर कार्यकर्ते साखळी इस्पितळाजवळ जमले. तेथून मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी जाण्याची तयारी करीत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी रोखले. या नेत्यांनी, आम्ही शांततेत यात्रा काढून मुख्यमंत्र्यां पुष्पगुच्छ देणार आहोत असे सांगितले. मात्र दुसर्या बाजूने भाजपचे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित झाल्याने वातावरण तंग झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आहे त्या ठिकाणी घोषणाबाजी करत व मेणबत्ती पेटवून आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी रोखले.
भाजपतर्फे कॉंग्रेसचा निषेध
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस विरोधात घोषणा दिल्या. महिला नेत्या सुलक्षणा सावंत यांनी, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जे विधान केले त्याचे पूर्ण समर्थन करताना सरकार बरोबरच पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी असे हे विधान आहे. त्यात काय चुकले असा सवाल केला. कॉंग्रेस नेते यांनी खाण घोटाळा व इतर बाबतीत राज्याला संकटात टाकले ते नेते आज कोणत्या आधारावर रस्त्यावर येतात असे विचारत दिगंबर कामत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. विधानसभेत राज्याच्या हिताचे निर्णय होत असताना विरोधक सभागृहाबाहेर जातात त्यांना जनताच अद्दल घडवेल असा इशारा दिला. गोपाळ सुर्लकर, दीपराज प्रभू, सिद्धी पोरोब, सुभाष मळीक, शुभदा सावईकर यांच्यासह उपस्थित सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या कृतीचा निषेध केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कार्यकर्त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुमारे दोन तास पावसात भिजत कॉंग्रेसविरोधी घोषणा देत होते. दुसरीकडे कॉंग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते होते. परंतु तेही घोषणाबाजी करीत होते. या घटनेत पोलिसांची बरीच धावपळ उडाली. शेवटी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निघून गेले व प्रकरण निवळले.
पोलीस बळाचा अकारण
वापर ः चोडणकर
गिरीश चोडणकर यांनी भाजपवर टीका केली व अकारण पोलीस बळ दाखल केले. महिलांना रोखताना पोलिसांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला. माजी आमदार प्रताप गावस यांनी आम्ही शांततेत मुख्यमंत्र्यांना भेटून पुष्पगुच्छ देणार होतो. मात्र एवढा पोलीस पहारा कशासाठी असा सवाल उपस्थित केला.