केरी-पेडणे येथे एक कोटीचे अमलीपदार्थ जप्त

0
282

>> स्थानिकांनी केली होती अमली पदार्थांची लागवड

पेडण्याते नवे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी काल थोरलेबाग, केरी – पेडणे येथील एका घरावर छापा मारून एक कोटी वीस लाख रुपये किंमतीचा अमलीपदार्थ जप्त केला. स्थानिक संशयित रामा केरकर (२२), रश्मी केरकर (४४) आणि शिवाजी केरकर (३४) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अमलीपदार्थ प्रकरणात स्थानिकांना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.

यापूर्वी दीड कोटीची गांजाची लागवड मोरजी – मरडीवाडा येथे एका रशियन पर्यटकाने केल्याचे आढळले होते. त्यानंंतर हा दुसरा मोठा छापा पेडणे पोलिसांनी मारला. पेडणे तालुक्यातील किनारी भागांत घरांच्या टेरेसवर काहींनी मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याचा सुगावा पेडणे पोलिसांना लागला होता. पेडणे पोलिसांनी त्याविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. केरी पेडणे या ठिकाणी एका घरात मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती.

थोरलेबाग केरी येथे रामा केरकर यांच्या घरात छापा मारून एक कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. संशयित रामा केरकर, रश्मी केरकर आणि शिवाजी केरकर या स्थानिकांना अटक करण्यात आली आहे. लागवड केलेली गांजाची झाडे दोन किलो २९ ग्रॅम असून त्यांचे मूल्य पाच लाख रुपये, सुका गांजा १ किलो, त्याची किमत १ लाख ३० हजार, दीड किलो चरस मिळून एक कोटी २२ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानंद प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, संजीत कानोळकर, हरीश वेंगुर्लेकर, विनोद पेडणेकर, रवी म्हाळोजी, अनिश्कुमार पोके, यशोदीप उगवेकर, जीवन गोवेकर, महेश नाईक, उदय गोसावी, मिथिल परब, भास्कर च्यारी, स्मिता गावस, तृप्ती सातोस्कर आदींनी ही कारवाई केली.

मुख्य संशयित मोकळा
या अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेला मुख्य संशयित मात्र या कारवाईपासून मोकळा असल्याची चर्चा दिवसभर केरी गावात सुरू होती. तो सध्या इस्पितळात असल्याचे सांगितले जात आहे. ५ रोजी पेडणे पोलिसांनी गावडेवाडा, मांद्रे येथे असाच छापा टाकून गांजाची ३ लाखांची झाडे जपत केली होती.