ऑक्टोबरच्या १९ दिवसांत कोरोनाचे ८,७८९ रुग्ण बरे

0
259

राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. या महिन्याच्या एकोणीस दिवसांत ८,७८९ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.५९ टक्के एवढे आहे.

राज्यात चोवीस तासांत १५९ नवे रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या ५४९ एवढी झाली आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन ७४२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १५९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ७४६ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३२८३ एवढी झाली आहे.
राज्यातील आणखी ५१९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ९१४ एवढी आहे. कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या १६४ जणांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या २० हजार १९५ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन ४२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

या महिन्यात आत्तापर्यंत २७ हजार ८९० स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ७ हजार ३२८ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण आलेले नाही. दरदिवशी सरासरी सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. या महिन्यात आत्तापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.