केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ई. श्रीधरन भाजपचे उमेदवार

0
97

मागील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरले असून त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ई श्रीधरन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती केरळमधील एमओएस एमईए व भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांनी दिली.
केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणे हे आपलं मुख्य उद्दिष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असल्याचे श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याअगोदरच सांगितले होते.
केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणार्‍या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे.

वायनाडमध्ये कॉंग्रेसला धक्का
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी जिंकून आलेल्या वायनाडमध्येच राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे. वायनाड जिल्ह्यातल्या ४ प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. कॉंग्रेस सोडलेल्या नेत्यांमध्ये केरळ प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला कॉंग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश कॉंग्रेस समितीचे सजस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे.