गुरूवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू

0
164

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७९८ एवढी झाली असून कोरोना बळींचा आकडा आठशेच्यानजीक येऊन ठेपला आहे.

राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,२१२ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३८ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ७७५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४० टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १,५६५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.४१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

इस्पितळात नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६७ इतकी आहे. मडकई आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.

१३ वर्षीय मुलाचे
कोरोनाने निधन

कांदोळी येथील एका १३ वर्षीय मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. त्याला १६ फेब्रुवारीला उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आला होता. ओल्ड गोवा येथील ३८ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे. त्याला २१ फेब्रुवारीला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते.