केरळमध्ये कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू

0
25

>> कोविडच्या जेएन1 चा भारतात शिरकाव

>> देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यांना सतर्कतेच्या सूचना

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर नगरपालिका प्रभागात कोरोनाची बाधा झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर, परिसरात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात असून आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाने मृत्यू झालेला रुग्ण 80 वर्षांचा होता. खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.
कोरोना आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा उपप्रकार भारतात आल्याचे समोर आले आहे. कोविड-19 चा उपप्रकार जेएन1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले असून कोरोनाने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

18 नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत 79 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, केरळचे आमदार केपी मोहनन यांनी शनिवारी कन्नूर येथील पनूर नगरपालिका रुग्णालयात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली.
सध्या भारतातील कोविड-19 रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत आणि गृह विलिगीकरणात आहेत. यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशामध्येही जेएन1 सब-व्हेरिएंट आढळून आला होता. ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेले होते. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी हा स्ट्रेन आढळल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. भारतात जेएन1 व्हेरियंटचा इतर कोणताही दुसरा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 लाख 33 हजार 316 इतकी आहे. तर रिकव्हरी दर 98.81 टक्के इतका आहे. कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. केरळमध्ये 13 डिसेंबर रोजी नवीन कोरोना व्हायरस जेएन1 प्रकार आढळून आला. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी, भारतात कोरोनाची प्रकरणे वाढत असून त्यात जेएन1 देखील असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.

चोवीस तासांत देशात 335 नवे बाधित

थंडीचा मोसम आल्यापाठोपाठ देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासांत 335 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. यापाठोपाठ सक्रिय रुग्णांची संख्यादेखील वाढून 1701 वर गेली आहे.

केरळमध्ये तातडीची बैठक

केरळमध्ये कोविडच्या भीतीनंतर आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच या पार्श्वभूमीवर केरळच्या सीमा बंद केल्या जाणार नसल्याचेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

जेएन-1ची लक्षणे

सध्या तरी कोविड -19 जेएन1 मध्ये इतर प्रकारांपेक्षा वेगळी लक्षणे आहेत की नाही हे अजून सिद्ध झालेले नाही. सध्या लक्षणे सारखीच मानली जातात. यामध्ये ताप, सततचा खोकला, लवकर थकवा, नाक बंद पडणे, नाक वाहणे, जुलाब, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात.