लोकसभा निवडणुकीत आरजीने काँग्रेसला पाठिंबा द्यावा : चोडणकर

0
16

येत्या 2024 मध्ये होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीत रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आपण यापूर्वीच पक्षाच्या नेत्यांना केलेले आहे. त्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही बोलणी केलेली आहे. आम्ही राजभवनवर जेव्हा मोर्चा नेला होता तेव्हा रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर हेही आमच्याबरोबर होते, असे काँग्रेस नेते व गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.
सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षाने काँग्रेसशी हातमिळवणी करावी व ‘इंडिया’ आघाडीला आपला पाठिंबा द्यावा, अशी आमची विनंती आहे, असे चोडणकर म्हणाले. येत्या लोकसभा निवडणुकीत खरा मुकाबला हा काँग्रेस व भाजप यांच्यातच होणार आहे, असे सांगून राज्यातील जनतेलाही त्याची कल्पना असल्याचे चोडणकर म्हणाले.लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना मते देऊन काहीही फायदा होणार नाही याची लोकांना कल्पना असल्याचे चोडणकर यांनी पुढे बोलताना सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाला मते दिल्याने मतांचे विभाजन होऊन भाजपचाच पुन्हा विजय झाला हे आता लोकांना कळून चुकले असल्याचे चोडणकर म्हणाले.