‘केबीसी’साठी १४ वर्षे अथक प्रयत्न : रासम

0
271

पणजी (बबन भगत)
महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या सामान्य ज्ञानावर आधारित असलेल्या ‘रिऍलिटी शो’साठी निवड होणे ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. आपण गेल्या १४ वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आपणाला अमिताभ बच्चन यांच्यासमोरील ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी मिळू शकली असे कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊन ५० लाख रु. जिंकून परतलेले मीरामार येथील रहिवासी गजानन रासम यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
प्रश्‍न : केबीसीमध्ये जाण्यासाठीचा विचार तुमच्या डोक्यात कधी आला? त्यासाठी कोणती तयारी करावी लागली?
उत्तर : मी १५-१६ वर्षांचा होतो तेव्हापासून मला अमिताभ यांना भेटायची फार इच्छा होती. पण त्यांची भेट होणे ही तशी अशक्यप्राय अशीच गोष्ट होती. अशातच २००० साली ‘कौन बनेगा करोडपती’ हा सामान्य ज्ञानावर आधारित असलेला रिऍलिटी शो टीव्ही वाहिनीवर सुरू झाला आणि अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठीचा हा एक मार्ग आहे असा विचार डोक्यात आला. वाचनाची आणि सामान्य ज्ञान यांची आवड पूर्वीपासून होती. त्यामुळे २००० साली केबीसीमध्ये जायचा विचार मनामध्ये पक्का केला आणि कामाला लागलो. मात्र, केबीसीमध्ये जाण्यासाठी घरात दूरध्वनी हवा असे कळल्यानंतर २००४ साली लॅण्ड लाईनसाठी अर्ज केला. केबीसी सुरू होण्यापूर्वी काही दिवस रोज टीव्हीवरून प्रश्‍न विचारले जायचे. मी त्या प्रश्‍नांची उत्तरे पाठवायचो. २००४ सालापासून माझे हे चालू होते. यापूर्वीच्या दोन सिझनसाठीही मला बोलावणे आले होते. पण माझी निवड होऊ शकली नव्हती. पण निराश न होता मी प्रयत्न चालूच ठेवले.
प्रश्‍न : म्हणजे तुम्ही नक्की काय केले?
उत्तर : मी भरपूर वाचन करायचो. कितीतरी वृत्तपत्रे वाचायचो. गुगलवरून माहिती मिळवायचो. महाभारत व रामायण पाच वेळा वाचून काढलं. वाचनात आलेली महत्त्वाची माहिती मी वहीत लिहून ठेवायचो. अशा हजारो पाने भरतील एवढ्या वह्या माझ्याकडे आहेत.
प्रश्‍न : ह्या सगळ्या माहितीचा उत्तरे देताना फायदा झाला?
उत्तर : हो तर! ह्या माहितीच्या आधारावरच मी बाजी मारू शकलो. माझा अभ्यास तर १४ वर्षे अथकपणे चालू होता. मी रोज २ तास सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करीत असे.
प्रश्‍न : ‘हॉट सीट’वर बसण्याचा अनुभव कसा होता? आणि अमिताभ बच्चनविषयी काय सांगाल?
उत्तर : ‘हॉट सीट’साठी जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मला जो आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नाही. पण मी खूप घाबरलोही. समोर अमिताभ बच्चनला बघितले आणि गर्भगळीत झालो. हातपाय लटपटायला लागले. तोंडातून शब्द फुटेनासे झाले. मी हॉट सीटवर बसलो आणि त्या दिवसाचा वेळ संपला होता. पुढील चित्रिकरण हे दुसर्‍या दिवशी होणार होते. यावेळी बच्चन यांनी माझे हात हातात घेतले आणि खूप धीर दिला. घाबरू नकोस. हसत-खेळत प्रश्‍नांची उत्तरे द्यायची आहेत असे सांगून माझी भीती घालवली.
अमिताभ बच्चन हे जसे अभिनेते म्हणून ग्रेट आहेत तसेच ते एक माणूस म्हणूनही खूप चांगले आहेत. आपल्या समोर बसणार्‍या स्पर्धकाला ते खूप चांगली वागणूक देत असतात. त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली.
प्रश्‍न : स्पर्धकाला पाहिजे ते बोलता येते की त्याला लिहून दिले जाते?
उत्तर : स्पर्धकाला लिहून वगैरे काही दिले जात नाही. काय बोलायचे त्याचे स्वातंत्र्य त्याला असते. पण याचा अर्थ काहीही बोलता येते असे नाही. अमिताभ बरोबरच्या माझ्या गप्पा खूप रंगल्या. तुम्ही चित्रपटात ‘बेलबॉटम’ पॅन्टी घालायचे म्हणून मीही ‘बेलबॉटम’ पॅन्टी शिवून घेतल्या होत्या असे मी त्यांना सांगितल्यानंतर हास्यविनोद झाला.
प्रश्‍न : करोडपतीच्या निवड प्रक्रियेविषयी जरा विस्ताराने सांगाल?
उत्तर : तुम्ही टीव्हीवर विचारलेल्या प्रश्‍नांची बरोबर उत्तरे दिलीत की उत्तरे पाठवलेल्या कोट्यवधी स्पर्धकांमधून संगणक सुमारे २४ हजार स्पर्धकांची निवड करतो. नंतर ह्या स्पर्धकांची सगळी माहिती गोळा केली जाते. नंतर त्यांना ३ प्रश्‍न विचारले जातात. त्यातून पुन्हा २४०० जणांची निवड त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे होते. नंतर स्पर्धकांची ऑडिशन होते. ऑडिशन २०-२५ मिनिटांचे असते. ऑडिशनमध्ये फक्त वैयक्तिक माहिती विचारली जाते. ह्यावेळी २४०० जणांमधून १३० ते १५० जणांची ‘फास्ट्‌स फिंगर फर्स्ट’साठी निवड केली जाते. त्यासाठी दर आठवड्याला १०-१० स्पर्धकांना बोलावतात. प्रश्‍न : केबीसीनंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडला?
उत्तर : केबीसीमुळे माझ्या आयुष्याला एकाप्रकारे कलाटणीच मिळाली. एका रात्रीत माझे नाव झाले. मला लोक ओळखायला लागले. आता मला खूप लोकांचे फोन यायला लागलेत. त्यातील बर्‍याच जणांना केबीसीमध्ये जायची इच्छा आहे. कुणालाही मार्गदर्शन हवे असेल तर ते मी करायला तयार आहे.