केजरीवाल यांनी तिसर्‍यांदा घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
108

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त करत आम आदमी पक्षाने सलग तिसर्‍यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काल रविवारी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिल्लीच्या विकासात योगदान देणार्‍या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल, अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी रविवारी तिसर्‍यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथ घेतलेल्या इतर नेत्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांचा समावेश होता. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मनिष सिसोदिया यांनी मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री काम पाहिले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यासाठी दोन हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.