केजरीवालांसाठी आता ‘डीपी मोहीम’

0
7

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जात आहे. एका विद्यमान मुख्यमंत्र्याला तुरुंगात डांबल्याने विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दुसऱ्या बाजूला आता आम आदमी पक्षाने ‘डीपी’ मोहीम सुरू केली आहे. आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी या संदर्भात काल माहिती दिली. दरम्यान, डीपीला अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील फोटो असून, ‘मोदीजी का सबसे बडा डर केजरीवाल’ असे या फोटोवर लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रेरणा घराघरांत पोहोचण्यासाठी या देशात सोशल मीडियावर डीपी कॅम्पेन सुरू करत आहोत, असे आतिशी मार्लेना म्हणाल्या. कालपासून आम आदमी पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आपले सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने इंडिया आघाडीतील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही अटक झाल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. या विरोधात इंडिया आघाडीने 31 मार्च रोजी महारॅलीचे आयोजन केले आहे. या महारॅलीत इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्ष सामील होणार आहेत.