केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे बेजबाबदारपणे वागल्याने देशात कोविडची स्थिती ही गंभीर बनल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला. ही स्थिती नियंत्रणात यावी यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या त्यात सूचना केलेल्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.
लस उत्पादन क्षमता वाढावी यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी, कोविड लशींची निर्यात बंद करावी, कोविड लस तयार केलेल्या इतर उत्पादकांना मान्यता द्यावी, लस खरेदी करण्यासाठी दुप्पट निधीची तरतूद करावी, राज्य सरकारांना लस खरेदी व वाटणीत जादा अधिकार द्यावेत तसेच कोरोना महामारीमुळे संकटात असलेल्या सामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसाहाय्य करावे, असे सात मुद्दे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडले असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. भाजप सरकारने ह्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी केल्यास कोविडमुळे निर्माण झालेले संकट नियंत्रणात येण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
गोवा सरकारनेही आता लोकांविषयी संवेदनशीलता दाखवून उत्सवी वातावरणातून बाहेर यावे. तसेच सर्वांना विश्वासात घेऊन लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.