>> सण-उत्सवांसाठी जारी केली नवी मार्गदर्शक तत्त्वे
केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण सावधगिरीने आणि सुरक्षितपणे साजरे करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार ‘प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून ओळखल्या जाणार्या भागात आणि ५% पेक्षा जास्त संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये. या व्यतिरिक्त, सणांच्या वेळी खबरदारी घेण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून आधीच पुरेशा आवश्यक सूचना जारी कराव्यात.
कोविडशी संबंधित योग्य वर्तनाचे उल्लंघन झाल्यास सरकारने दंडात्मक कारवाईसाठी पावले उचलावीत. तसेच केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑनलाइन मेळावे, ऑनलाइन खरेदी करण्यास आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी विविध पद्धतींचा तपास करण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास सांगितले आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी स्थानिक बाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवावे असे म्हटले आहे.
केंद्र सरकारने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना ज्यांनी लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कालावधी संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना लस घेण्याबाबत आग्रह करावा असे सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत ७१.२४ कोटी लोकांना म्हणजेच ७६ टक्के नागरिकांना लशीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर, ३०.०६ कोटी म्हणजेच ३२ टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे.