कॅसिनोंसाठी गेमिंग कमिशनरची नियुक्ती लवकरच : मंत्री काब्राल

0
88

कॅसिनोंसाठी गेमिंग कमिशनरची शक्य तेवढ्या लवकर नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सरकारने कॅसिनोसाठीचा प्रवेश कर रद्द केल्याने सरकारला ५ हजार कोटी रु. चे नुकसान होत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचे ते म्हणाले.
कॅसिनोचाच नव्हे तर सगळाच प्रवेश कर २०१७ साली बंद करण्यात आला होता. मात्र, सरकारने परवाना शुल्क वाढवले आहे. तसेच कॅसिनोवर जे खेळासाठीचे चिप्स विकत घेतले जातात त्यावर राज्य सरकारला १४ टक्के व केंद्र सरकारला १४ टक्के एवढा वाणिज्य करही मिळत असतो, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंतील सांडपाण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हजेरीत शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असते. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या प्रकरणी सरकारवर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे काब्राल यांनी सांगितले.

प्रत्येक कॅसिनो जहाजात सांडपाणी गोळा करण्यासाठी एक टाकी असते. सांडपाणी या टाकीत सोडल्यानंतर त्याला सील ठोकण्यात येते. हे सील गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या हजेरीत खोलण्यात येते. नंतर हे सांडपाणी टँकरमध्ये भरले जाते. त्यानंतर टँकरमधून हे सांडपाणी सांडपाणी प्रकल्पात सोडण्यात येते. ही सगळी प्रक्रिया अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली पार पडली जाते, असे काब्राल यांनी सांगितले.