कॅपिटल्ससमोर बंगलोरचे ‘रॉयल चॅलेंज’

0
83

दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या तुल्यबळ संघांमध्ये आज सोमवारी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील १९वा सामना खेळविला जाणार आहे.
कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स या दोन्ही फ्रेंचायझी सध्या फॉर्ममध्ये आहेत. अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांचा पराभव त्यांनी आपल्या मागील सामन्यात केला आहे. त्यामुळे हे दोन संघ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

दिल्ली संघाचा विचार केल्यास कोलकाताविरुद्ध त्यांना २२८ धावांचा बचाव करताना घाम फुटला होता. विशाल धावसंख्या उभारूनही त्यांच्या पराभवाची शक्यता होती. परंतु, मोक्याच्या क्षणी कोलकाताचा ऑईन मॉर्गन बाद झाल्याने दिल्लीला १८ धावांनी विजय मिळवणे शक्य झाले. या सामन्यातील गोलंदाजांच्या खराब कामगिरीचा अपवाद सोडल्यास त्यांच्या गोलंदाजांनी यापूर्वीच्या प्रत्येक सामन्यात फलंदाजांच्या तोडीस तोड कामगिरी केली आहे. कगिसो रबाडा व ऍन्रिक नॉर्के ही दक्षिण आफ्रिकन जलदगती दुकली प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवत आहे. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा याने किफायतशीर मारा करतानाच दबावाखाली बळी देखील मिळवले आहेत.

पहिल्या सामन्यातील दुखापतीनंतर संघात परतलेल्या रविचंद्रन अश्‍विन याच्या दोन षटकात कोलकाताने २६ धावा चोपल्या होत्या. परंतु, दिल्लीचा संघ त्याला संघात कायम राखण्याची शक्यता आहे. त्यामुळे अष्टपैलू अक्षर पटेल याला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागू शकते. फलंदाजी विभागात दिल्लीसाठी चिंता करण्याचे कारण नसावे. आघाडी तसेच मधल्या फळीने आपल्या फलंदाजीने छाप सोडली आहे. ऋषभ पंतने मागील काही सामन्यांत केलेल्या समयोचित खेळी तो परिपक्व होत असल्याचे दाखवून देत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरचे कुशल नेतृत्व गोलंदाजीतील बदल व फलंदाजी फळीतील लवचिकता दाखवताना दिसून येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाला गवसलेला सूर मात्र दिल्लीसमोरील समस्या वाढवू शकतो.

कर्णधार विराट कोहलीने दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये झळकावलेले नाबाद अर्धशतक दिल्लीच्या गोलंदाजांसाठी जणू इशाराच ठरत आहे. नवोदित डावखुरा फलंदाज देवदत पडिकल याने चार लढतींत तीन अर्धशतके झळकावून सर्वांनाच प्रभावित केले आहे. श्रीलंकेच्या इसुरु उदाना याला डेल स्टेनच्या जागी खेळवून बंगलोरने आपल्या मागील दोन लढतींत यश संपादन केले आहे. ऍडम झॅम्पा याला युजवेंद्र चहल याची अपेक्षित साथ देता आली नसली तरी विराट कोहली त्याला आज दिल्लीविरुद्ध बाहेर बसवण्याचा धोका पत्करणे कठीण आहे. वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या दोन लढतींत मिळून केवळ ३ षटके गोलंदाजी देण्याची चूक विराटने शेवटच्या दोन्ही सामन्यात सुधारली. याचे फळ त्याच्यासह संघाला देखील मिळाले. त्यामुळे बंगलोरचा संघ आपल्या गोलंदाजी किंवा फलंदाजी फळीत बदल करण्याची शक्यता नाही. एखादा खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नसला तरच संघात बदल संभवतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (संभाव्य) ः देवदत्त पडिकल, ऍरोन फिंच, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, शिवम दुबे, गुरकिरत मान, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उदाना, ऍडम झॅम्पा, नवदीप सैनी व युजवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स (संभाव्य) ः शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, ऋषभ पंत, मार्कुस स्टोईनिस, रविचंद्रन अश्‍विन, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, ऍन्रिक नॉर्के व हर्षल पटेल.