मुंबईकडून हैदराबादला पराभवाचा डोस

0
111

>> डी कॉकला गवसला सूर

>> बोल्ट- पॅटिन्सनचा भेदक मारा

मनीष पांडेकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर लाभ उठवत क्विंटन डी कॉक याने चोपलेल्या ६७ धावांना बोल्ट व पॅटिन्सन या वेगवान दुकलीच्या भेदक गोलंदाजीची साथ लाभल्यामुळे मुंबई इंडियन्सने काल रविवारी सनरायझर्स हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा १७वा सामना दुपारच्या सत्रात खेळविण्यात आला. विजयासाठी २०९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला ७ बाद १७४ धावांपर्यंतच मजल मारता आली.

मुंबईच्या डावाची सुुरुवात खराब झाली. वाईडच्या दिशेने जाणारा संदीप शर्मा याने टाकलेल्या चेंडूचा पाठलाग करण्याच्या नादात कर्णधार रोहित शर्मा यष्टिरक्षक बॅअरस्टोवकरवी झेलबाद झाला. पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर हैदराबादने रिव्ह्यूचा वापर करत रोहितला तंबूत पाठवले. जायबंदी भुवनेश्‍वर कुमार याच्या जागी संघात घेतलेल्या सिद्धार्थ कौल याने टाकलेल्या डावातील तिसर्‍या षटकात मुंबईने १८ धावा चोपल्या. या फटकेबाजीनंतरही मुंबईला सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये केवळ २ बाद ४८ धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादव दुसर्‍या गड्याच्या रुपात परतला कौलचा लेग साईडच्या बाहेर जाणारा एक ‘स्लोअर बॉल’ तटावण्याच्या नादात फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे त्याने सोपा झेल दिला. अब्दुल समदच्या गोलंदाजीवर मनीष पांडे याने क्विंटन डी कॉक याला सीमारेषेवर जीवदान दिले. यावेळी डी कॉक केवळ १६ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा पुरेपूर लाभ उठवत डी कॉकने अर्धशतकी खेळी केली. डी कॉक बाद झाल्यानंतर मुंबईच्या उर्वरित फलंदाजांनी या मजबूत पायावर कळस रचण्याचे काम केले. कायरन पोलार्डने १३ चेंडूंत नाबाद २५ धावा जमवल्या. खरी कमाल केली ती कृणाल पंड्या याने. त्याने डावातील शेवटच्या चार चेंडूंत दोन षटकार व २ चौकारांसह केवळ ४ चेंडूंत नाबाद २० धावा जमवून मुंबईला द्विशतकी वेस ओलांडून दिली.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जॉनी बॅअरस्टोव (२५) याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी दुसर्‍या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी रचली. एकवेळ हैदराबादचा संघ १ बाद ९४ अशा मजबूत स्थितीत होता. परंतु, केन विल्यमसन (३) व प्रियम गर्ग (८) अपयशी ठरल्याचा फटका त्यांना बसला. यामुळे आवश्यक धावगतीशी ताळमेळ त्यांना साधता आला नाही. वॉर्नर पाचव्या गड्याच्या रुपात परतल्यानंतर हैदराबादच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. बॅअरस्टोव गो. संदीप ६, क्विंटन डी कॉक झे. व गो. राशिद ६७ (३९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), सूर्यकुमार यादव झे. नटराजन गो. कौल २७, ईशान किशन झे. पांडे गो. संदीप ३१, हार्दिक पंड्या त्रि. गो. कौल २८, कायरन पोलार्ड नाबाद २५, कृणाल पंड्या नाबाद २०, अवांतर ४, एकूण २० षटकांत ५ बाद २०८
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-४१-२, थंगरसू नटराजन ४-०-२९-०, सिद्धार्थ कौल ४-०-६४-२, अब्दुल समद २-०-२७-०, राशिद खान ४-०-२२-१, केन विल्यमसन २-०-२४-०
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. किशन गो. पॅटिन्सन ६० (४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), जॉनी बॅअरस्टोव झे. हार्दिक गो. बोल्ट २५, मनीष पांडे झे. पोलार्ड गो. पॅटिन्सन ३०, केन विल्यमसन झे. डी कॉक गो. बोल्ट ३, प्रियम गर्ग झे. चहर गो. कृणाल ८, अभिषेक शर्मा त्रि. गो. बुमराह १०, अब्दुल समद झे. शर्मा गो. बुमराह २०, राशिद खान नाबाद ३, संदीप शर्मा नाबाद ०, अवांतर १५, एकूण २० षटकांत ७ बाद १७४
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-२८-२, जेम्स पॅटिन्सन ४-०-२९-२, कृणाल पंड्या ४-०-३५-१, जसप्रीत बुमराह ४-०-४१-२, कायरन पोलार्ड ३-०-२०-०, राहुल चहर १-०-१६-०