
डावखुरा सलामीवीर ऍलिस्टर कूकने नोंदविलेल्या नाबाद २४४ धावांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत तिसर्या दिवशी ९ गड्यांच्या मोबदल्यात ४९१ अशी धावसंख्या उभारत आपली स्थिती मजबूत केली आहे. इंग्लंडला १६४ धावांची आघाडी मिळाली असून त्यांचा अजून एक गडी बाकी आहे.
बॉक्सिंग डे कसोटीचा कालचा तिसरा दिवस गाजवला तो डावखुरा फलंदाज ऍलिस्टर कूकने. त्याने न केवळ आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले तर ४०९ चेंडूत २७ चौकारांच्या सहाय्याने २४४ नाबाद द्विशतकी खेळी करीत अनेक विक्रमकही पादाक्रांत केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कूकच्या साथीत जेम्स अँडरसन आपले खाते न खोलता खेळपट्टीवर नाबाद खेळत होता.
दुसर्या दिवसाच्या २ बाद १९२ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने दिवसभराच्या खेळात आणखी ७ गडी गमावताना २९९ धावांची भर घातली. कर्णधार जो रुटने काल आपले अर्धशतक पूर्ण केले. ७ चौकारांच्या सहाय्याने १३३ चेंडूत ६१ धावांची खेळी केल्यानंतर तो पॅट कमिन्सच्या चेंडूवर नाथन लियॉनकडे झेल देऊन परतला. रूट तंबूत परतल्यानंतर इंग्लंडची मध्यफळी कोलमडली. डेव्हिड मलान (१४), जॉनी बेअरस्टो (२२), मोईन अली (२०), क्रिस वोक्स (२६) आणि टॉम कर्रन (४) यांना जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही व ठराविक अंतराने तंबूत परतले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती एकवेळ ८ बाद ३७३ अशी झाली होती. परंतु एक बाजू संभाळून ठेवत कूकला तळाचा फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने चांगली साथ देताना ९व्या विकेटसाठी १०० धावांची शतकी भागीदारी केली. ब्रॉड ८ चौकार व १ षट्कारासह ६३ धावांचे अर्धशतकी योगदान दिले.
ऑस्ट्रेलियातर्फे जोस हॅजलवूड, नाथन लियॉन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
धावफलक,
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ३२७.
इंग्लंड, पहिला डाव, (२ बाद १९२ वरून पुढे) ऍलिस्टर कूक नाबाद २४४, जो रुट झे. नाथल लियॉन गो. पॅट कमिन्स ६१, डेव्हिड मलान पायचित गो. जोस हॅजलवूड १४, जॉनी बेअरस्टो झे. टीम पायने गो. नाथन लियॉन २०, मोईन अली झे. शॉन मार्श गो. नाथन लियॉन २०, ख्रिस वोक्स झे. टीम पायने गो. पॅट कमिन्स २६, टॉम कुर्रन झे. टीम पायने गो. जोस हॅजलवूड ४, स्टुअर्ट ब्रॉड झे. उस्मान ख्वाजा गो. पॅट कमिन्स ५६, जेम्स अँडरसन नाबाद ०.
अवांतर १२. एकूण १४४ षट्कांत ९ बाद ४९१ धावा.
गोलंदाजी ः जोस हॅजलवूड ३०/५/९५/३, जॅक्सन बर्ड ३०/५/१०८/०, नाथन लियॉन ४२/९/१०९/३, पॅट कमिन्स २९/१/११७/३, मिचेल मार्श १२/१/४२/०, स्टीव्हन स्मिथ १/०/११/०.
विक्रमवीर कूक
इंग्लंडला माजी कर्णधार तथा डावखुरा सलामीवीर ऍलिस्टर कूकने मेलर्बन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर नाबाद २४४ धावांची खेळी करीत कारकीर्दीतील पाचवे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे द्विशतक नोेंदवित अनेक विक्रम नोंदविले. त्याने भारताचा दिग्गज फलंदाज लिटल मास्टर सुनील गावस्करच्या विक्रमाशी बरोबरी केली. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणार्यांच्या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. कूकच्या ११,९५६ धावा झाल्या असून बारा हजारी बनण्यासाठी त्याला केवळ ४४ धावांची आणि त्रिशतकासाठी ५६ धावांची गरज आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, वेस्ट इंडीजचा डावखुरा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आणि दिग्गज ब्रायन लारा यांना मागे टाकले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१५,९२१) अग्रस्थानावर आहे.
एवढेच नव्हे तर तो २०१७मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज बनला असून त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. पाच द्विशतके नोंदवित कूकने ग्रीम स्मिथ आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले. एक सलामीवीर फलंदाज म्हणून त्याचे हे पाचवे द्विशतक असून तो संयुक्त दुसर्या स्थानी पोहोचला आहे. हा विक्रम श्रीलंकेचा अट्टापटू (६) आणि भारताचा वीरेंद्र सेहवाग (६) यांच्या नावे आहे.